Nilesh Lanke
Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'तहसीलदार देवरे यांच्या बदलीसाठीचा नवस लंकेंनी पोलिसांसह फेडला...'

Amit Awari

अहमदनगर : आमदार नीलेश लंके यांच्या दौऱ्याबाबत भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. वाघ यांनी तहसीलदार ज्योती देवरे व आमदार नीलेश लंके यांच्या वादाचा आधार घेत चित्रा वाघांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे. हे भाष्यच नवीन राजकीय वादाला जन्म देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. त्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मोठी राळ उठविली होती. आमदार नीलेश लंके व पारनेर तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्यांवर वाघ यांनी जोरदार टीका करत पारनेर तालुक्यातील पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. अखेर तहसीलदार देवरे यांची जळगावला बदली झाली. त्यांच्या जागी पारनेरला पूर्णवेळ तहसीलदार मिळालेला नाही. मात्र देवरे-लंके वादावर पडदा पडला आहे.

देवरे-लंके वाद हा पारनेरमधील आरोग्य सेवकाला मारहाण व महिला आरोग्य अधिकाऱ्याला झालेल्या शिवीगाळच्या आरोपाने पेटला होता. यात पोलिस निरीक्षक बळप यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप तहसीलदार देवरे व चित्रा वाघ यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आज चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो व्हायरल केला आहे. या फोटोत आमदार नीलेश लंके यांच्या बरोबर पोलिस निरीक्षक बळीप व पोलिस ठाणे अंमलदार भालचंद्र दिवटे दिसत आहे. हे तिघे विमान प्रवास करत असल्याचे दिसत आहे. यात बळप यांना लाल रंगाच्या बाणाने तर अंमलदार दिवटे यांना निळ्या रंगाच्या बाणाने दर्शविले आहे.

या फोटो संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ओळखलतं का यांना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे पोलिस निरीक्षक बळप तर पोलिस दिवटे आमदार नीलेश लंके या 2 पोलिसांना विमानाने फिरवून आणताहेत. एव्हढी बडदास्त आमदार ठेवतोय म्हंटल्यावर त्याने या पोलिसांसमोर कुठल्या महिलांना शिव्या देवो किंवा हात उगारो जीभ कशी रेटेल बोलायला आणि हात कसे उठतील कारवाईसाठी?. तहसीलदार ज्योती देवरेच्या बदलीसाठी या सगळ्यांनी केलेला नवस फेडायला गेलेत म्हणे. एका महिलेला हटवल्याचा असूरी आनंद दिसतोय चेहऱ्यावर… वाईट गोष्ट ही की यात सरकारमधल्यांपासून सगळेच सहभागी… आम्ही ही चिवट आहोत लढत राहू शेवटपर्यंत तुमच्या तोंडाला फेस आणेपर्यंत…, असा सूचक इशाराही चित्रा वाघ यांनी ट्विटमधून दिला आहे.

बड्या नेत्याशी संघर्ष?

हा फोटो व ट्विटमुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वादळ अजून शांत झालेले नसल्याचे संकेत आहेत. भाजपच्या वाघ यांनी मात्र आमदार लंकेंपाठोपाठ बळीप यांनाही धारेवर धरल्याचे दिसून येत आहे. आमदार लंके यांच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील एका बड्या नेत्याशी लंके यांचा संघर्ष सुरू आहे. त्यातूनच असे आरोप होत असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT