MLA Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLA Nilesh Lanke : मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर लंके पोहाेचले शेतकऱ्यांच्या बांधांवर

Parner News : केवळ पंचनामे न होता सरकारने शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

राजेंद्र त्रिमुखे

Nagar : पारनेर तालुक्याच्या विविध गावांमध्ये रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. तालुक्यातील अनेक भागात रविवारी दुपारी मोठ्या गारपिटीसह वादळी पाऊस झाला. यात उभी पिके अक्षरशः आडवी झाली. आज पहाटेचे लंके यांनी पानोली परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

पारनेर तालुक्यातील अनेक परिसरामध्ये झालेली गारपीट आणि वादळी पाऊस वारा यामुळे कांदा, ज्वारी, टोमॅटो अशी सर्वच पिके भुईसपाट झाली असून, पूर्णपणे नष्ट झाल्याचे चित्र आहे. या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी आमदार नीलेश लंके यांच्यासमोर आपली व्यथा मांडत तातडीने पंचनामे व्हावेत आणि केवळ पंचनामे न होता सरकारने शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप पीक अगोदरच हातात गेलेले आहे. त्यानंतर रब्बीचेही काही पीक थोडेफार आले, त्याचेही नुकसान आता अवकाळी गारपिटीने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चालू वर्ष पूर्णपणे वाया गेले असून, शेतकऱ्यांसाठी मदतीची मोठी गरज असल्याचं त्यांनी सांगितले. पंचनामे आणि तातडीची मदत शासनाकडून हवी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना कालच पत्र पाठवले आहे. मात्र, प्रशासनाने नुकसानभरपाईबाबत चालढकल केल्यास येणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रविवारी दुपारी पारनेर-नगर मतदारसंघातील पारनेर, पानोली, सांगवी सूर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगणथेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे, जातेगांव, म्हसणे सुलतानपुर, गटेवाडी, पठारवाडी, लोणीमावळा या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

पारनेर-नगर मतदारसंघातील गावांमध्ये जून-जुलै व ऑगस्टमध्ये अजिबात पाऊस झालेला नव्हता. त्यामुळे एकही पीक वाया गेले नव्हते. त्यानंतर काही गावांमध्ये झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. ही पिके आता हाताशी आलेली असतानाच या अवकाळी वादळी पावसामुळे व गारपिटीमुळे ही पिकेही वायाला गेली आहेत. पिकांबरोबरच फळबागा, रब्बी व नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

पारनेर तालुका हा अगोदरच दुष्काळी, पठारी व आदिवासी भाग आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा स्थितीत गारपीट व अवकाळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचे तत्काळ सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे आदेश संबंधित विभागास देण्याची मागणी लंके यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT