Vijay Auti & Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार नीलेश लंके यांची विजय औटींना एकाकी पाडण्याची खेळी

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील चार नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात पारनेर ( Parner ) नगरपंचायतीचाही समावेश आहे.

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात पारनेर नगरपंचायतीचाही समावेश आहे. त्यामुळे पारनेर शहरासह तालुक्यात राजकीय घटनाक्रमाला वेग आला आहे. MLA Nilesh Lanke's preparations to leave Vijay Auti alone

मागील एक वर्षापूर्वीच नगरपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपली होती. मात्र कोरोना कालावधीमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात येत होत्या. अखेर कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने पारनेर नगरपंचायतची निवडणूक जाहीर केली. विधानसभेनंतरची ही पारनेर तालुक्यातील पहिलीच मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीत विजय मिळवून आपले वर्चस्व पारनेर शहरातही सिद्ध करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके ( MLA Nilesh Lanke ) करत आहेत. या नगरपंचायतीवर माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी ( Vijay Auti ) यांची सत्ता आहे. ही सत्ता हेरावून घेण्यासाठी लंके यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विजय औटी हे राज्यात अभ्यासू नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यकाळातच पारनेर शहरात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या.

विजय औटींचा विधानसभेत पराभव केल्यावर त्यांचा पारनेरमध्येही पराभव करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी मोठी राजकीय खेळी काल ( रविवारी ) रात्री बरोबर 10 वाजून 10 मिनिट झाल्यावर खेळली. आमदार लंके यांनी पारनेरचे माजी उपसरपंच विजय डोळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. डोळ हे शिवसेनेचे पारनेर तालुक्यातील इव्हेंटचे महत्त्वाचे काम पाहत असत.

विजय डोळ यांनी 2002मध्ये शिवसेनेकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या विजय औटींनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2004मध्ये विजय औटींनी शिवसेनेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवत विजय मिळविला. सलग 17 वर्षे डोळ यांनी विजय औटींची साथ दिली.

आमदार लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. पारनेर नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांनी डोळ यांचे मन वळवत त्यांना राष्ट्रवादीत घेतले. या प्रवेशामुळे विजय डोळ यांच्या पत्नी सुवर्णा डोळ या पारनेर नगरपंचायतच्या प्रभाग 11च्या उमेदवार असणार आहेत.

यांचाही झाला राष्ट्रवादी प्रवेश

विजय डोळ यांच्या बरोबरच शिवसेनेचे रामदास औटी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे पुतणे डॉ. सचिन औटी यांची पत्नी प्रभाग 17मधून राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत. याशिवाय डॉ. सचिन औटी, सारिका औटी, बंडू गायकवाड, राधिका गायकवाड, धीरज महांडुळे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

औटी पडले एकाकी

विधानसभा निवडणुकीनंतरच पारनेर नगरपंचायतमधील विजय औटींच्या सत्तेला आमदार लंके यांनी आव्हान देण्यास सुरवात केली होती. शिवसेनेचे चार नगरसेवक त्यांनी रातोरात राष्ट्रवादीत आणले होते. महाविकास आघाडी असतानाही शिवसेनेला राष्ट्रवादीने चांगलेच खिंडार पाडले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने हे चारही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत आले पण मनाने ते राष्ट्रवादीचेच राहिले. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला केव्हाच जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे विजय औटी यांचे शिवसेनेतील जुने साथीदार फोडून त्यांना एकाकी पाडण्याची खेळी आमदार नीलेश लंके खेळत असल्याची चर्चा पारनेर तालुक्यात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT