मराठा समाजाचे नेते, मनोज जरांगे-पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद थांबता थांबत नाही. बार्शीतील मराठा समाजातील एका तरुणाला अपहरण करून मारहाण केल्याचं समोर आलं आहे. यावरून जरांगे-पाटील यांनी अप्रत्यक्षपणे आमदार राऊत यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला होता. याला प्रत्युत्तर देताना आमदार राऊत चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले.
"मराठा समाजातील तरूणाचं अपहरण करून मारहाण झाली असतील, तुमच्याही कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणणार," असा इशारा जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी नाव न घेता आमदार राऊत यांना दिला होता. पण, "मला गोळ्या वगैरे घालून जरांगे-पाटील माझ्या मुलांना रडवणार आहेत का? महाविकास आघाडीनं जरांगे-पाटलांना आमच्यासारख्या आमदारांना गोळ्या घालण्याची सुपारी दिली का?" असं म्हणत आमदार राऊत भडकल्याचं पाहायला मिळालं.
जरांगे-पाटील काय म्हणाले?
बीडमध्ये घोंगडी बैठकीत बोलताना जरांगे-पाटलांनी म्हटलं, "मराठा समाजातील एका तरूणाचं अपहरण करून मारहाण केल्याची माहिती मला मिळाली आहे. हे खरे की खोटे माहिती घेतल्याशिवाय सांगणार नाही. मात्र, असे काही घडले असल्यास तरूणाच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा हिशेब घेमार. तुमच्याही कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणणार."
आमदारांना गोळ्या घालण्याची सुपारी दिली का?
जरांगे-पाटलांच्या विधानावर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आमदार राऊत ( Rajendra Raut ) म्हणाले, "कुणाला मारहाण झाल्याचं माझ्या ऐकण्यात आलं नाही. वैयक्तिक कारणातून मारहाण झाली असेल, तर याची माहिती मी घेईन. पण, 'खरे की खोटे तपासतो,' असं जरांगे-पाटील म्हणत आहेत. तेच म्हणत आहेत की, 'मुलांच्या डोळ्यात पाणी आणतो.' मला गोळ्या वगैरे घालून जरांगे-पाटील माझ्या मुलांना रडवणार आहेत का? महाविकास आघाडीनं जरांगे-पाटलांना आमच्यासारख्या आमदारांना गोळ्या घालण्याची सुपारी दिली का?"
जरांगे-पाटील कुणाच्या सुपाऱ्या घेत आहेत
"सगळ्यांना मारतो, हाणतो, रडवतो, अशी दमदाटी जरांगे-पाटील करत आहेत. हे काय हिटलर झाल्यात का कळेना मला. महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही? जरांगे-पाटील आता दादा झाले आहेत. लोकांनी जगायचं की नाही? बीडसारखं आमदारांची घरे पेटवायचं जरांगे-पाटलांनी ठरवलं आहे? जरांगे-पाटील कुणाच्या सुपाऱ्या घेत आहेत," असा सवाल आमदार राऊत यांनी उपस्थित केला.
आमची लेकरे रडवायची असतील, तर रडवा
"बार्शीत शरद पवारसाहेबांची सभा झाली. त्यानंतर पवारसाहेब दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथूनच बार्शीत पेटवा-पेटवीचा उद्योग सुरू झाला आहे. नंतर जरांगे-पाटील म्हणाले, 'राऊतांपेक्षा सोपल बरे आहेत.' तुम्ही दुसऱ्यांवर सुपारी घेतल्याचे आरोप करता. मग तुम्ही कुणाच्या सुपाऱ्या घेऊन आरोप करत आहात? आम्हाला गोळ्या घालायच्या असतील, तर कुठे थांबू सांगा? आमची लेकरे रडवायची असतील, तर रडवा. बीडमधील किती लेकरे रडवली आहेत, हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आमची लेकरे रडवण्याची भाषा करत असतील, तर राज्य सरकारनं याची दखल घ्यावी," अशी मागणी आमदार राऊत यांनी केली.
प्रत्येक तालुक्यात राजकारण आहे
"खरे खोटे याची माहिती जरांगे-पाटलांनी घ्यावी. प्रत्येक तालुक्यात राजकारण आहे. मराठा आरक्षणाचा विषय राजकारणावर घेऊन जाऊ नये. ही चुकीची गोष्ट आहे," असंही आमदार राऊत यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.