Rohit Pawar- Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar On Ajit Pawar : त्यांना सांगा बच्चा आता मोठा झाला, रोहित पवारांनी अजितदादांना डिवचले !

सरकारनामा ब्यूरो

हेमंत पवार

Rohit Pawar News : स्वाभिमानी जनता अहंकाराला धुडकावून लावते हे सर्वांनी पाहिले आहे. दुसऱ्याला पाडणे यापेक्षा निवडून आणणे अवघड असते. पवारसाहेब पाडायचे बोलत नाहीत, निवडून आणण्याचे बोलतात.त्यामुळे जे पाडण्याची भाषा करतात त्यांचे जवळचे आणि त्यांचे उमेदवार पडलेले आपण बघितले आहेत, असा टोला आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाव न घेता लगावला.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आमदार पवार यांनी बुधवारी कऱ्हाड येथील जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीस्थळी अभिवादन केले. त्यांनतर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांचे जास्त खासदार निवडून आलेले आहेत. भाजपच्या विरोधात फार मोठा रोष आहे. पक्ष फोडणे, कुटूंब फोडणे, महापुरुषांचा अवमान यामुळे भाजपला हे अपयश बघावे लागले. निष्ठा, विचार आणि महाराष्ट्र धर्माबरोबर जे नेते राहिले त्यांना यश मिळाले. लोकांना संघर्ष पसंत असतात. जवळचे लोक सत्तेत जाण्यासाठी गेले आणि त्यांना मोठे अपयश आले.

पवार कुटुंबातील संघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले, पवार कुटूंबात भाजपने संघर्ष घडवला. भाजपने परिवार फोडून दिल्ली स्टाईलमध्ये महाराष्ट्रात चालते, असे भाजपला वाटले. मात्र, त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही. लोकांना कुटुंब फोडणे, विचाराला सोडून सत्तेसाठी पक्षाबाहेर जाणे हे महाराष्ट्रातील जनतेला आवडत नाही. हे कालच्या निवडणुकीच्या निकालातून दिसुन आले. खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कोणाचा हे देखील लोकांनी त्यांच्या अदालतीत दाखवून दिले. लोकांनी महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत प्रतिसाद दिला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळून महाविकास आघाडीचे सरकार येईल. व्यक्ती हरला की जिंकला यापेक्षा विचार जिंकला हे महत्वाचे आहे.

बारामतीतील विजयाबद्दल रोहित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांचे काम, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेले कष्ट यामुळे आमचा विजय झाला. नेत्यांमुळे मतदान होते असे नाही तर लोकांमुळे मतदान होत असते. आम्ही वयाने आणि अनुभवानेही लहान असल्यामुळे आम्हाला हिणवलं जात होते. मात्र, लोकांनी पाठिंबा देवून आम्हाला मोठे केल्याचे वाटत आहे. वडीलधारी असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते काम करत असतात. आम्ही विचार जपण्यासाठी संघर्ष करत असताना आम्हाला 'ये बच्चे है', असे म्हंटले जात होते. त्यामुळे जे लोक हिणवत होते, त्यांना आता बच्चा मोठा झाला आहे ,असे मला सांगायचे आहे. युवा पिढीला तुम्ही सहज घेवू नका,असा इशारा त्यांनी दिला.

फडणवीसांनाही लगावला टोला

नेहमी टीव्हीवर येणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी टीव्हीवर का नाही आले, असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे. असे सांगुन रोहित पवार म्हणाले, मी त्यांचे अभिनंदन करतो की त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांना एकाच आकड्यात ठेवले.असेच यश त्यांना येणाऱ्या विधानसभेला मिळावे, अशी मी प्रार्थना करतो.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT