Sanjay Shinde
Sanjay Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संजय शिंदेंचे महाआघाडीशी नाते कायम : राजन साळवींना केले मतदान!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे (Sanjay Shinde) यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करून राज्यसभा निवडणुकीनंतर उठलेल्या वादळावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, महाविकास आघाडीशी आपण एकनिष्ठ असल्याचेही आमदार शिंदे यांनी दाखवून दिले आहे. (MLA Sanjay Shinde's support to Mahavikas Aghadi)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बोलविण्यात आलेल्या विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. त्यामध्ये पहिला प्रस्ताव हा विधानसभा अध्यक्ष निवडीचा झाला. त्यात भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उतरविण्यात आले होते. प्रत्यक्ष शिरगणतीला सुरुवात झाल्यानंतर नार्वेकर यांना शिवसेनेच्या बंडखोर आमदार, भाजप यांच्याबरोबरच हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही मतदान केले.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकर यांना १६४ मते पडली. त्यांच्या विरोधातील राजन साळवी यांना मात्र १०७ च मते पडली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणारे करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्यास पसंती दिली. त्यांनी ६० व्या क्रमांकावर आपले मत साळवी यांना दिले. मधल्या काळात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार शिंदे यांच्या मताबाबत आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर शिंदे यांनी राऊत यांची भेट घेत त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक शिंदे यांच्या बंडानंतर कोणी गद्दारी केली, हे उघड झाले आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीत राऊतांनी काहींची नावे घेऊन संशयाचा धुराळा उडवून दिला होता.

महाविकास आघाडीची स्थापना होण्यापूर्वी आमदार शिंदे यांनी सुरूवातीला भाजपला पाठिंबा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे लक्षात येताच त्यांनी आघाडीला पाठिंबा जाहीर करून मोकळे झाले होते. त्यामुळे आत्ताच्या सत्ताबदलाच्या राजकारणात ते कोणती भूमिका निभावणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पण त्यांनी राजन साळवी यांना मतदान करत आपण महाविकास आघाडीशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT