Subhash Deshmukh
Subhash Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur BJP MLA : भाजप आमदार म्हणाले, ‘लोकं म्हणतात दारुविक्रीत माझा हात... ’ ; भरसभेतून लावला APIला फोन

तात्या लांडगे

Solapur BJP MLA News : सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिनधास्तपणे अवैध दारूविक्री सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे, दारूबंदीचे ठराव होऊनही हातभट्टीची विक्री थांबलेली नाही. असाच एक अनुभव दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठा गावातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलेले भाजप आमदार सुभाष देशमुख यांना आला. त्यावेळी त्यांनी मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना थेट कॉल लावला आणि अवैध दारू विक्री बंद करण्याची सूचना केली. (MLA Subhash Deshmukh's phone call to 'API' for liquor ban)

बोळकवठा या गावात आमदार निधीतून मंजूर झालेल्या तीन कोटी ६० लाख रुपयांच्या रस्त्याच्या भूमिपूजनाला शनिवारी (ता. १० जून) आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित महिलांनी गावातील अवैध दारू विक्रीसंदर्भातील माहिती भाजप (BJP) आमदार देशमुख यांना दिली. दारूबंदी करावी, अशी मागणी त्यांनी आमदारांकडे केली.

रस्त्याच्या भूमिपूजनाची सभा सुरू असतानाच आमदार देशमुख यांनी त्यांच्या खासगी स्वीय सहायकाच्या माध्यमातून मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मांजरे यांना कॉल लावला.

आमदार देशमुख यांनी फोनवरून पोलिस निरीक्षकांना म्हणाले की, ‘बोळकवठा येथील लोकांनी मला अडविले आहे. ते म्हणत आहेत, की तुमच्या आशीर्वादानेच दारूविक्री सुरू आहे की काय. मी त्यांना म्हणातोय, मी या गावात कधी येतो, कधी जातोय तर का? त्यामुळे यात माझा हात कसा असेल? तरीही लोक विचारतात की, मग दारूबंदी का होत नाही? गावातील लोकांनी माझ्यावर केलेले आक्षेप तेवढे खोडून काढण्याचा प्रयत्न करा. वेळप्रसंगी अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांना आपला दंडुका दाखवा आणि हे गाव व्यसनापासून कसे दूर राहील, याकडे विशेष लक्ष द्या. गावातील लोकांचे पुण्य तुम्हाला मिळेल’, असे म्हणत आमदार देशमुखांनी दारुविक्रीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली.

म्हणजे माल लयं हायं वाटतं...

मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारूची एकही हातभट्टी नाही. बाहेरून विक्रीसाठी येणाऱ्या दारू वाहतुकीवर आमचे विशेष लक्ष आहे. जानेवारी २०२२ ते मे २०२३ या काळात ८९ गुन्हे दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक मांजरे यांनी आमदार देशमुखांना सांगितले. बाहेरून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर १५ गुन्हे दाखल केले आहेत. या पुढील काळात देखील विशेष लक्ष देऊन अधिक कठोर कारवाई करण्याची ग्वाही सहायक पोलिस निरीक्षक मांजरे यांनी आमदार देशमुख यांना दिली. त्यावेळी देशमुख म्हणाले, ‘एवढ्या कारवाया करूनही दारूबंदी झाली नाही, म्हणजे लय माल हायं वाटतं’.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT