BJP leaders intensify lobbying for Sangli-Satara MLC candidature as names close to Jaykumar Gore, Dhananjay Mahadik and Shivendraraje Bhosale gain attention. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : शिवेंद्रराजेंचे व्याही, जयकुमार गोरेंचा भाऊ अन् धनंजय महाडिक यांचे बंधू... आमदारकी नात्यागोत्यातच ठेवण्यासाठी 'नेतेमंडळींची' फिल्डिंग

सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेखर गोरे, सम्राट महाडिक आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या नावांची चर्चा रंगली असून स्थानिक राजकीय समीकरणांवर उमेदवारी ठरणार आहे.

Rahul Gadkar

MLC Election : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या उमेदवारीसाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. यासोबतच या दोन्ही जिल्ह्यातील नेतेमंडळींकडूनही ही आमदारकी आपल्याच घरात कशी ठेवता येईल यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

सातारा-सांगली विधानपरिषद मतदरसंघात भाजपकडे मजबूत बहुमत आहे. भाजपकडे दोन्ही जिल्ह्यांमध्ये 314 इतके पक्षीय बलाबल आहे.त्यामध्ये सांगलीतील 115 आणि सातारा मधील 199 मतदार आहेत. त्यामुळे इथल्या आमदारकीसाठी भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यात मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या नात्यातील नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

सांगलीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे आणि साताऱ्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची नावे चर्चेत आहेत. पण स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, संघटनात्मक ताकद आणि आगामी निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार असल्याची चर्चा आहे.

साताऱ्यातून मंत्री जयकुमार गोरे यांनी बंधू तथा सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र त्यांचे निकटवर्तीय सुनील काटकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. शिवाय भाजपचे धैर्यशील कदम देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत.

सांगली जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू आणि जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि पृथ्वीराज देशमुख यांची नाव चर्चेत आहेत. पृथ्वीराज देशमुख हे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे व्याही आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या राजकुमारी ऋणालीराजे आणि पृथ्वीराज देशमुख यांचे सुपुत्र रविराज यांचा विवाह झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातून माघार घेत सम्राट महाडिक यांनी आमदार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा दिला होता. तर पृथ्वीराज देशमुख यांना देखील भाजपने विधानपरिषदेवर एक वर्ष संधी दिली होती. सध्याची परिस्थिती पाहिली तर साताऱ्यात भाजपमध्ये उमेदवारीवरून मतभेद आहे. याचा लाभ सांगलीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT