MNS Ahmednagar
MNS Ahmednagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मनसेकडून महावितरण कार्यालयाला चपलांचा हार

अमित आवारी

अहमदनगर - महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे खासगीकरण थांबावे यासह प्रलंबित मागण्यांसाठी महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. या दोन दिवसांत अहमदनगर शहरातील मोठ्या भागाचा विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला चपलांचा हार घातल जोरदार घोषणाबाजी केली. ( MNS defeats MSEDCL office in Ahmednagar )

विद्युत वितरण कंपनीचे खासगीकरण करण्याच्या विरोधात कर्मचारी आंदोलन करत होते. हे आंदोलन सायंकाळी स्थगित झाले. या आंदोलनात 29 संघटना सहभागी झाल्या होत्या. सोमवारपासून ( ता. 28) शहरातील सावेडी उपनगर, शहर गावठाण, नगर-कल्याण रस्ता, केडगाव आदी ठिकाणीचा वीज प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांत महावितरण विरोधात संताप आहे.

नागरिकांना उन्हाळा असल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यातच उन्हाची लाट आल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. या विजेच्या लपंडावामुळे शहरातील पाणी वितरणावरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी महावितरण कार्यालय व अधिकाऱ्यांना दुरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.

नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या नेतृत्त्वा खाली शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, उपाध्यक्ष तुषार हिरवे, नितीन भुतारे, डॉ. संतोष साळवे, संकेत व्यवहारे, दिनेश गायकवाड आदींनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी अधीक्षक अभियंता व इतर अधिकारी अनुपस्थित असल्याचे कळाल्यावर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला चपलांचा हार घालत महावितरण प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली.

सचिन डफळ म्हणाले, मनसेतर्फे महावितरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात आज आंदोलन करण्यात आले. दोन दिवस महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. संप करण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. मात्र अहमदनगर शहरात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. शहराचा निम्मा भाग अंधारात आहे. वीज असताना महावितरणाच्या काही कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक वीज प्रवाह खंडित केला. काही ठिकाणी बिघाड केला. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना असुनही महावितरण प्रशासनाने पर्यायी व्यवस्था निर्माण केली नाही. आम्ही वीज बिले भरतो. ज्यांची वीज बिले थकतात त्यांची वीज जोडणीची कारवाई झटपट होतो. मग वीज बिले भरणाऱ्यांना अखंडित वीज का दिली जात नाही. ग्राहकांना मनस्ताप देऊ नका. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. महावितरणने पर्यायी व्यवस्था तयार करावी, असे डफळ यांनी सांगितले.

गजेंद्र राशिनकर म्हणाले, संपात खोडसाळपणा केला जात आहे. जनतेला वेठीस धरले जात आहे. त्याचा त्रास जनतेला झाला. तुम्ही संप करा, त्याचे सर्वसामान्य ग्राहकांना देणे-घेणे नाही. जे नागरिक रितसर वीज बिले भरतात, त्यांना तुम्ही तुमच्या संपासाठी वेठीस धरू नका. जनतेला वेठीस धरणाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणीही राशिनकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT