Babanrao Gholap
Babanrao Gholap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिर्डीत खासदार शिवसेनेचाच होणार : बबनराव घोलपांच्या उपस्थितीत मुस्लीम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश

आनंद गायकवाड

Shivsena : शिवसेनेपासून शिंदे गट वेगळा झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी माजी मंत्री बबनराव घोलप हेच शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार असणार असे जाहीर केले होते. तसेच त्यांना उत्तर जिल्हा संपर्क प्रमुखही नियुक्त केले आहे.

घोलप यांनी दोन दिवस जिल्हा दौरा काढला. यात जिल्ह्यातील उत्तर भागातील प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्यास सुरवात केली. घोलपांनी संगमनेरमध्ये शिवसेना मेळावा घेतला. या मेळाव्यात मुस्लीम महिला व युवकांनी घोलप यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रसंगी बबनराव घोलप म्हणाले, शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकांना आमदार, खासदार, मंत्री केले. त्यांचेच कार्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी काहींनी गद्दारी केली. आगामी निवडणुकीत शिर्डी लोकसभेत शिवसेनेचाच खासदार होणार आहे. नगर जिल्ह्यातही तीन ते चार आमदार निवडून आणण्याचा निर्धार बबनराव घोलप यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, की शिवसैनिकांची दखल घेण्यासाठी व गद्दारी केलेल्या नेत्यांचा समाचार घेण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर मेळावे घेतले जात आहेत. मागासवर्गीय समाजाला नोकरी व राजकारणात आरक्षणाची आम्ही सुरवात केली. आपल्या मंत्रिपदाच्या काळात एपीजे अब्दुल कलाम आर्थिक महामंडळ स्थापले. मुस्लिम समाजाला सोबत घेतले. आगामी निवडणुकांत सत्त्वपरीक्षेच्या काळात शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे.

दक्षिण नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी, निष्ठावान शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरण रोड, सुकेवाडी रोड, लखमीपुरा, अलकानगर परिसरातील तब्बल दोनशे मुस्लिम युवक व चाळीस महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.

प्रास्तविक नरेश माळवे यांनी केले, तर स्वागत तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी केले. सूत्रसंचालन प्रथमेश बेल्हेकर यांनी केले, तर आभार शहरप्रमुख अमर कतारी यांनी मानले. याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप, रवींद्र पारकर, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडीप्रमुख शीतल हासे, शहरप्रमुख प्रसाद पवार, अशोक सातपुते, सुरेखा गुंजाळ, आशा केदारी, जयवंत पवार, ॲड. दिलीप साळगट, रंगनाथ फटांगरे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेत आम्ही आणले. मंत्री केले. मात्र ते उपकार विसरले. बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक कधीही फुटणार नाही. जे फुटले, ते मतलबी होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोखंडे तसेही जनतेपासून अंतर ठेवून होते. त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली आहे.

- बबनराव घोलप, माजी मंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT