Yuvraj Sambhajiraje Chhatrapati | Devendra Fadnavis
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati | Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संभाजीराजेंची भाजपशी चर्चा; दोन बड्या नेत्यांच्या भेटीगाठींमुळे भूमिकेबाबत सस्पेन्स कायम

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारकीची मुदत तीन मे रोजी संपली आहे. त्यानंतर नुकतेच त्यांनी नवी आपण राजकारणात उतरणार असून लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरून ते कोणत्या राजकीय पक्षात जाणार की स्वतःचा राजकीय पक्ष काढून 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी १२ मेे रोजी आपण पुण्यातून आपली पुढची भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News)

मात्र त्यापूर्वीच संभाजीराजेंनी भाजपच्या गोटातील महत्वाच्या दोन बड्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेत चर्चा केल्याने त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी नुकताच गुजरात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे विश्वासु व जवळचे मानले जाणारे राज्यसभा खासदार रामभाई मोकरिया यांची भेट घेत चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण १ तास ही चर्चा सुरु होती. संभाजीराजे यांचा राज्यसभा कार्यकाळ संपण्याच्या दिवशीच ही भेट झाल्याने पुढील वाटचाल भाजपमधून करण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

मोकारिया यांच्या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती आज राज्यातील भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये भेट होत आहेत. या भेटीत नवा पक्ष काढयचा की भाजपमध्ये प्रवेश करायचा याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय संभाजीराजे यांना आजच्या बैठकीत भाजपमध्ये येण्याची ऑफर मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

सतेज पाटील यांच्याकडून संभाजीराजेंना निमंत्रण :

दरम्यान, काँग्रेस नेते, गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीराजे यांना काँग्रेस पक्षात येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे. पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेसमध्ये (Congress) आले तर त्यांचे स्वागत केले जाईल. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आहे. मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमधून आमदार म्हणून चांगले काम केले आहे. संभाजीराजे आपली पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते काँग्रेसमध्ये आले तर स्वागतच आहे, असे पाटील म्हणाले होते.

खासदार संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा, असे प्रत्येकच राजकीय पक्षाला वाटते. पण त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा आंदोलन, आरक्षण, सारथी अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली. ते छत्रपतींच्या घराण्यातील असल्याने ते आपल्या पक्षात यावेत, असे वाटण्यात गैर काहीच नाही, असे पाटील यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT