MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खासदार उदयनराजे राष्ट्रवादीचे चक्रव्यूह भेदणार...?

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना सामावून घेण्याबाबत अद्यापपर्यंत तरी निर्णय झालेला नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांना सातारा, कराड, पाटण तालुक्यातील मतदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने टाकलेला चक्रव्यूह भेदण्यात उदयनराजे यशस्वी होणार का, याची उत्सुकता आहे.

उद्या (रविवारी) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत असून या बैठकीत अर्ज मागे घेणे, नेत्यांच्या मागणीनुसार जागा वाटपाचा तिढा सोडविणे आणि खासदार उदयनराजेंना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये समावून घेणे अथवा त्यांच्या विरोधात उमेदवार अंतिम करणे आदी बाबींवर निर्णय केला जाणार आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्यास तीन दिवस बाकी आहेत. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच कोणा कोणाला अर्ज मागे घेण्यास सांगायचे हेही निश्चित झालेले नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष उद्या (रविवारी) होणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीकडे लागले आहे.

उदयनराजेंना सामावून घेण्याबाबतचा चेंडू अखेरच्या क्षणापर्यंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर सोपवून राष्ट्रवादीचे नेते गंमत पहात बसले आहेत. खासदार उदयनराजे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तेथे सर्वाधिक मते सातारा, कऱ्हाड व पाटण तालुक्यात आहेत. येथील मतांवर प्रामुख्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचा प्रभाव आहे. दुसऱ्या बाजूने या मतदारसंघातील ५५ मते उदयनराजेंकडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वांनी मदत केली तरच उदयनराजेंना निवडणूक सोपी जाणार आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील काल (शुक्रवारी) बारामतीस जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भेटून आलेले आहेत. या भेटीत त्यांना काही कानमंत्रही या निवडणुकीसाठी मिळालेला असणार आहे. मुळात उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीने तीन ते चार उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत. त्यापैकी कोणाचा अर्ज ठेवायचा हे निश्चित झालेले नाही. तसेच उदयनराजेंशीही आमदार शिवेंद्रसिंहराजेंचीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे सर्वसमावेशक मध्ये उदयनराजेंना सन्मानाने सामावून घेतले तर ठिक अन्यथा, निवडणूक लढायची अशा तयारीत उदयनराजे व त्यांचे समर्थक सल्लागार आहेत. उदयनराजेंचा जिल्हा बॅंकेच्या काराभारात संचालक असूनही कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांना सामावून घेण्याचाही निर्णय होऊ शकतो. याबाबत सभापती रामराजे नार्इक- निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे हे तिघे उद्याच्या बैठकीत काय निर्णय घेणार यावर सर्व चित्र अवलंबून आहे.

विजयासाठी १३६ मतांची बेरीज....

उदयनराजे ज्या मतदारसंघातून लढत आहेत. त्यामध्ये एकुण २७२ मतदार आहेत. यातील सर्वाधिक मतदार सातारा तालुक्यात ९८, कऱ्हाड ६६, फलटण १३, पाटण ४०, वाई १५ मते आहेत. उदयनराजेंना निवडुन येण्यासाठी १३६ मते मिळाली तर ते निवडून येऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT