Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena News : ''गजानन कीर्तिकरांनी वाचा फोडली; शिंदे गटाचे 22 आमदार, 9 खासदार ठाकरेंच्या संपर्कात''

सरकारनामा ब्यूरो

Vinayak Raut Latest News : शिंदे गटाचे 22 आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

कोल्हापुरात एका कार्यक्रमाकनिमित्त विनायक राऊत, दिवाकर रावते हे आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपवर (BJP) जोरदार टिका केली. राऊत म्हणाले, मंत्री शंभूराजे देसाई यांना काय करायचे आहे ते करू द्या, एक मात्र नक्की आहे की, शिंदे गटामध्ये गेलेल्या बऱ्याच आमदारांमध्ये असंतोष आहे.

त्या असंतोषाला पहिली वाचा खासदार गजानन कीर्तिकर यांनी फोडली, असे अनेक आमदार आहेत की त्यांचा भ्रमनिरास झाला. 50 खोके व कोट्यावधी रुपयांचा निधी देण्याचे कबूल करण्यात आले होते. मात्र, आता तसे काही घडताना दिसत नाही आहे, असा हल्लाबोल राऊत (Vinayak Raut) यांनी केला.

चार-पाच मंत्री सोडले तर बाकीच्यांना सर्वांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सर्वांनाच असे वाटते की, आम्हाला फसवलेले. आपल्याला परतीचा मार्ग स्वीकारावा लागतोय, अशा भावना अनेकांची आहे. म्हणून सुरुवात गजानन कीर्तिकर यांनी केली. त्यामुळे आम्ही योग्य वेळेला जाहीर करु, असेही राऊत म्हणाले.

शिंदे गटाचे 22 आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरे यांच्या सर्वांच्या संपर्कात आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत 'मातोश्री'चे दरवाजे या गद्दारांना उघडे राहणार नाही. परंतु यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिंदे गटाकडूनही ठाकरे गटातील अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत असे सांगितले जाते. येत्या काही दिवसात ते आमदार आणि खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाही केला जात आहे. या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT