NCP Minister Nawab Malik
NCP Minister Nawab Malik sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नारायण राणे गुजरातला लपतछपत कोणाला भेटायला गेले होते?

सरकारनामा ब्युरो

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मुंबईत काल ( मंगळवारी ) घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण वाढले आहे. राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) व भाजपवर टीका केली. ( Narayan Rane had gone to Gujarat secretly to meet someone )

नवाब मलिक म्हणाले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार, खासदार दिसत नसतील तर त्याबाबत आम्ही काही बोलू शकत नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. खासदार राऊतांनी आयटी विभागातील 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार समोर आणला आहे. मी विरोधी पक्षात असताना इथले एजंट कोण हा विषय उपस्थित केला होता. आता अमोल काळेचे नाव समोर आलंय अजून नाव समोर येतील. आता ही सुरवात आहे, असा टोलाही मलिकांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे लोक म्हणतात यात काही नाही मग घाबरतात कशाला. दोन वर्षे कोविड होता. त्यामुळे राजकारण नको ही आमची भूमिका होती. आम्ही लोकांना मदत करत होतो, लोकांचे जीव वाचवत होतो. मात्र भाजपच्या नेत्यांना प्रत्येक बाबतीत भ्रष्टाचार दिसतो, त्यांना दूध दिसत नाही शेणच दिसते. भाजपच्या काळात जे भ्रष्टाचार झालाय त्यावर निश्चित कारवाई होईल. भाजपचे नेते महात्मा गांधींचे भाषणांतून नाव घेतात मात्र यांची गोडसे नीती आहे. ते गोडसे विचारांना प्रोत्साहन देतात. असे प्रकार 8 वर्षांत या देशात जोरात सुरू आहेत.

नारायण राणे हे दरवेळी अडचणीत आले की पक्ष बदलतात. राणे भाजपत का गेले. त्यांना अविघ्नची भीती का वाटत होती. अविघ्न बिल्डिंग आरोप झाल्यावर राणे लपत छपत गुजरातला कोणाला भेटायला गेले? ती भीती निर्माण करून तुमचा भाजप प्रवेश कसा झाला याची माहिती आमच्याकडे आहे, असा गौप्य स्फोटही नवाब मलिक यांनी केला.

विधानसभा अध्यक्षाची निवडणूक

राज्यात कोविडचा परिस्थिती आटोक्यात येतेय. त्यामुळे निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. 3 मार्चपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यादृष्टीने झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडीवर चर्चा झाली. यात मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची तारीख निश्चित करून राज्यपालांना कळवावी असे ठरविण्यात आले आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

पटोलेंच्या मंत्री पदाची शिफारस

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मंत्रीपदाच्या चर्चां विषयी नवाब मलिक म्हणाले की, जर नाना पटोले यांना मंत्री व्हायचं असेल आणि त्यांच्या पक्षाकडून शिफारस आली तर मुख्यमंत्री निश्चित निर्णय घेतील. मी मंत्री होईन असं त़े सांगतात, ते 10 मार्चला मंत्री होणार असतील म्हणून असं बोलले असतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT