Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : उदयनराजे, शिवेंद्रराजेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी, शिवसेनेची एन्ट्री: आमदार घोरपडेंसह शिंदेंचेही बुरूज ढासळले

Satara ZP News : आमदार महेश शिंदेंना आत्मविश्वास नडल्‍याने त्यांचे दोन्ही उमेदवार पडले असून, १५ वर्षांपासून अभेद्य असलेला आमदार मनोज घोरपडेंचा बुरूज ढासळला असून, त्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एन्ट्री झाली आहे.

विकास जाधव

विकास जाधव

Satara News: सातारा तालुक्यात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असले तरी यावेळेस प्रथमच या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना, एकनाथ शिंदेंची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने शिरकाव केला आहे.

त्याचा थेट शिवेंद्रसिंहराजेंना फटका बसणार नसला तरी आगामी काळातील राजकीय वाटचालीत हे त्रासदायक ठरणार आहे. आमदार महेश शिंदेंना आत्मविश्वास नडल्‍याने त्यांचे दोन्ही उमेदवार पडले असून, १५ वर्षांपासून अभेद्य असलेला आमदार मनोज घोरपडेंचा बुरूज ढासळला असून, त्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एन्ट्री झाली आहे.

ताकद लावूनही अपयश

सातारा तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट व १६ गणांत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ५ गट व १० गणांत विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. यात सातारा-जावळी मतदारसंघातील ३ जागा असून, कऱ्हाड उत्तरमधील १, कोरेगावमधील एका जागेचा समावेश आहे, तर कोरेगाव व कऱ्हाड उत्तरमध्ये समावेश असलेल्या गटात भाजपला रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आले आहे. हे गट मुळात शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदेंकडे होते. त्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न करूनही त्यांना हे गट राखता आले नाहीत.

दोन्‍ही राजे गटाची एकजूट

कारी गटातून यावेळेसही मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक राजू भोसले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. त्यांच्या मतदारसंघात विरोधकांचे फारसे अस्तित्व दिसून आले नाही. शेंद्रेत खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी उमेदवारी न मिळाल्याने शिंदेंच्‍या शिवसेनेतून रिंगणात उरवून भाजपच्या उमेदवारापुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेंद्रे गटातील जनतेने त्यांना नाकारत शिवेंद्रसिंहराजे समर्थक पूजा मोरेंना मताधिक्याने निवडून दिले. येथे दोन्ही राजेंचे गट एकजुटीने चालल्याचे स्पष्ट झाले.

पंचायत समितीत भाजप; पण विरोधासह

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या लिंब गटात सर्जेराव सावंत यांनी निर्विवाद विजय मिळवला. नागठाणे गटात भाजपचे उमेदवार अजित साळुंखे यांच्यापुढे अपक्ष उमेदवार नंदू नलवडे यांनी आव्हान उभे केले होते. या लढतीत उदयनराजे समर्थक नलवडे यांचा निसटता पराभव झाला आहे, तर सातारा पंचायत समितीत भाजपने सर्वाधिक दहा जागांवर विजय मिळवत सत्ता कायम ठेवली आहे; पण पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडून आल्यामुळे आता विरोधकांचे अस्तित्व जाणवणार आहे.

जनतेच्‍या मदतीवर ‘विजयश्री’ची माळ

कऱ्हाड उत्तरमधील नागठाणे गट भाजपने राखला असला तरी वर्णे गट कायम करण्‍यात अपयश आले. वर्णे गटात आमदार मनोज घोरपडे यांचा १५ वर्षांपासून दबदबा मानला जातो. त्यांनी या गटातून पराभव पाहिला नव्हता; पण यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्याला पराभवाचा धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेळके या नवख्या उमेदवाराने जनतेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवर हा गड जिंकला आहे. जिल्ह्यातील हा पहिला उमेदवार असेल ज्याला जनतेने मतांसह आर्थिक मदत केली आहे, तर आमदार मनोज घोरपडे यांनी कऱ्हाड तालुक्यातील गटांकडे जास्त लक्ष दिल्याने त्यांचे वर्णे बालेकिल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्‍या पदरी अपयश आले. आता त्यांना हा गट बांधण्यासाठी पुन्हा नव्याने बांधणी करावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT