Jayant Patil Latest Marathi News, Jayant Patil on BJP, Jayant Patil Latest News in Marathi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

"राज्यात दंगली घडविण्याचा काहींचा कट" : जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

Jayant Patil | Mahavikas Aaghad : राज्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी होतो, तेव्हा असे वातावरण तयार केले जाते.

सरकारनामा ब्युरो

(Jayant Patil News)

इस्मामपूर : ज्यावेळी एखाद्या राज्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी होतो, त्यावेळी आपण पुन्हा निवडून येणार नाही अशी भीती असते, तेव्हा असे वातावरण तयार केले जाते. धर्मा-धर्मात तेढ निर्माण केला जातो. महाविकास सरकार पडावे यासाठी सर्व प्रयत्न झाले. मात्र सरकार आजही मजबूत आहे. म्हणून राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहेत, असे आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. (Jayant Patil Latest News in Marathi)

उरण-इस्लामपूर (Islampur) शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यावेळी अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड, (Jitendra Aavhad) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, अतिशय देखणी आणि उपयुक्त वास्तू उभारण्याचे काम येत्या काळात आपल्याला करायचे आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अल्पसंख्याक विभागामार्फत हे काम मंजूर करून घेतले होते. त्यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मोठी साथ लाभली होती. खरंतर ते आज या कार्यक्रमाला पाहिजे होते, मात्र सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई करून जेलमध्ये टाकण्याचे काम अस्वस्थ मंडळींनी केले आहे, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, मुस्लिम बांधवांनी प्रगती करावी यासाठी आमचा सर्वांचाच कायम प्रयत्न राहीला आहे. या समाजातील लोक शैक्षणिक क्षेत्रातही पुढे जावे यासाठी आम्ही काम करत आहोत. म्हणून येत्या काळात या भागातील उर्दु माध्यमिक शाळेचाही विकास आम्ही करणार आहोत. आज भारतात आणि राज्यात एक विचित्र परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अल्पसंख्याक बांधवांच्या हक्कावर कोण गदा आणू पाहत आहेत याची कल्पना आपल्याला आहे. मात्र महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना आम्ही कोणताही धक्का लागू देणार नाही, त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार आहे.

कोल्हापूरमध्ये पक्षाच्या मेळाव्यात आम्ही सर्वांनी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार राखण्याची शपथ घेतली आहे. कारण अलिकडे काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. लोक भोंग्यांवर बोलत आहेत, कोणाच्या तरी घरी हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट करत आहे. ज्यावेळी एखाद्या राज्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी होतो, त्यावेळी आपण पुन्हा निवडून येणार नाही अशी भीती असते, तेव्हाच असे वातावरण तयार केले जाते. धर्मा-धर्मात तेढ निर्माण केला जातो.

महाविकास सरकार पडावे यासाठी सर्व प्रयत्न झाले. मात्र सरकार आजही मजबूत आहे. म्हणून राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहे. यांच्या डावात आपल्याला फसायचे नाही. आपल्या राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी आपण सर्वच प्रयत्न करूयात आणि आपला सामाजिक एकोपा जपूयात, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT