Jayashree Jadhav
Jayashree Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महिलेला आमदारकी झेपणार नाही म्हणता मग चंद्रकांतदादांनी ऑफर का दिली होती?

सरकारनामा ब्यूरो

कोल्‍हापूर : ‘महिलेला आमदारकी झेपणार नाही, असा अपप्रचार विरोधातील भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. जर महिलेला आमदारकी झेपणार नाही, असे वाटते तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मला उमेदवारीची ऑफर का दिली होती,’ असा खडा सवाल महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. ही निवडणूक भावनेवर नाही तर विकासकामांवर लढत असल्याचेही त्यांनी खडसावून सांगितले. (NCP rally in Kolhapur for Jayashree Jadhav's campaign)

महाआघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज (ता. १ एप्रिल) आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात जाधव यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विधानावर सडेतोड भाष्य केले. दोन दिवसांपूर्वी महाडिक यांनी महिलेला आमदारकी झेपणार नाही, असे म्हटले होते.

या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर शहरातील जनतेने चंद्रकांत जाधव यांना विधानसभेत पाठवले होते; परंतु त्यांच्या निधनाने ‘उत्तर’ची पोटनिवडणूक लागली आहे. खरेतर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र भाजपने जनतेवर निवडणूक लादली आहे. आघाडीने एका महिलेस उमदेवारी दिली आहे. मात्र, भाजपकडून खालच्या पातळीवर प्रचारात टीका होत आहे. नेत्यांनी प्रचाराची पातळी सोडू नये.

‘‘कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत राष्‍ट्रवादीची जबाबदारी वाढली आहे. राष्‍ट्रवादीचे २५ हजार कार्यकर्ते जाधव यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. हाडाची काडं आणि रक्‍ताचं पाणी करून जयश्री जाधव यांना ५० हजार मताधिक्‍क्‍याने विजयी करावे, असे आवाहन करून मुश्रीफ म्हणाले की, महाविकास आघाडीने कोल्हापूर जिल्‍ह्यासाठी आत्तापर्यंत १०० कोटींचा निधी दिला आहे. उत्तरची आचारसंहिता संपल्यानंतर आणखी ५० कोटी शहर विकासासाठी दिले जाणार आहेत.

शहराध्यक्ष आर. के. पोवार, आमदार राजेश पाटील, जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राजेश लाटकर, आदिल फरास यांनी भाजपवर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT