Satara News : मला कोणत्या पक्षात जायचं ते कळतं. मी काय तीस वर्षे मुंबईला जाऊन लाटा मोजलेल्या नाहीत. मला स्वतःला भरपूर मिळालेले असून, मला कदाचित गव्हर्नर करतील, असं म्हणत विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या भविष्यातील धक्कादायक वाटचालीचे संकेत दिले. कोळकी (ता.फलटण) येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सध्या तालुक्यात खोट्या केसेस, दमदाटीचे राजकारण सुरू झाले आहे. सत्तेचा गैरवापर करून आम्ही कधीही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही, कारण ते आमचे संस्कार नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीत विरोधक पैसे वाटत असताना आमचे कार्यकर्ते घरी त्यामुळे पराभव झाला. तुम्ही घाबरून घरी बसणार असाल तर आम्हाला लढाई करायची आहे; पण सैन्यच पळपुटे निघाले, तर काय उपयोग?
आता जे गेले ते आमच्यासाठी मेले. आगामी निवडणूक आमची राहिलेली नसून कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अस्तित्वाची आणि शांततेने जगण्याची लढाई बनली आहे. मला आता वाद घालणारा, गाव पातळीवर पोलीस केसेसला न घाबरणारा कार्यकर्ता अपेक्षित आहे. वाटेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही तुमच्यासाठी तुरुंगात जाऊ; पण तुम्ही मागे हटता कामा नये, असे आवाहनही रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
रामराजे नाईक निंबाळकर भाजपच्या वाटेवर?
मला कोणत्या पक्षात जायचं ते कळतं. 30 वर्षे मुंबईला जाऊन मी काय लाटा मोजलेल्या नाहीत. मला स्वत:ला भरपूर मिळाले आहे. मला कदाचित गव्हर्नरही करतील, पण मला आता काही नको, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. पण फलटण तालुका आणि एकूण सातारा जिल्ह्यातील वर्चस्व पुन्हा प्राप्त करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना ठोस राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे.
रामराजे, संजीवराजे आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी लोकसभा, विधानसभेवेळी राजकीय अपरिहार्यतेने घेतलेल्या निर्णयांचा त्यांच्या राजकारणाला मोठा फटका बसला. राजकीय समीकरणे वेगाने बदलत गेल्याने राजे गटातील अनेक बुरूज ढासळले. केंद्रात, राज्यातील सत्तेचा उपयोग करत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचा गट कणखरपणे बांधला. आपली तालुक्यातील मांड पक्की करण्यावर भर दिला.
आताच्या स्थितीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर आमदारकीमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. तर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेले संजीवराजे आणि अन्य कार्यकर्ते तिथे सक्रिय नाहीत. त्यामुळे नाईक निंबाळकर कुटुंबीय दोन्ही राष्ट्रवादीत असूनही नसल्यासारखे आहे. यामुळे एकट्या पडलेल्या राजे गटाची भाजपच्या वाटेवरील चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे.
पण भाजपमधील रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे राजे गटाला सामावून घेणार का? असा प्रश्न आहे. यातूनच मध्यंतरी रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि रणजीतसिंहांसोबत जुळवून घेण्याचे सुतोवाच केले होते. पण भाजपमध्ये गेल्यास राजकारण कसे असेल याची मांडणी आधी रामराजे निंबाळकर यांना करावी लागणार आहे. त्यांना तालुक्यात अप्पर हॅन्ड मिळणार का? याचं उत्तर कार्यकर्त्यांना द्यावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.