मुंबई : महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते. मात्र, सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी करमाळा येथे व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान आज करमाळा येथे झालेल्या सभेत बोलताना पाटील यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.
या वेळी पाटील म्हणाले, दबावतंत्राचे राजकारण केले जात आहे. २०१९ च्या काळात भाजपमध्ये जाण्यासाठी माझ्यावरही दबावतंत्र वापरले गेले. पण मी आदरणीय शरद पवारसाहेबांची साथ सोडली नाही, असा गोप्यस्पोट जयंत पाटील यांनी केला. आज आपला पक्ष सत्तेत आहे. आपणही कोणत्याही दबावाखाली न येता आदरणीय पवारसाहेबांचे विचार मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी काम करा, आपल्या बुथ कमिट्या ताकदवान करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
सध्या राज्यात चुकीचे वातावरण फोफावत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कारण नसताना ईडीने अटक केली आहे. असेही पाटील म्हणाले. कोणत्याही प्रकारे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पाडायचे, यासाठी राज्यातील काही जण कार्यरत आहेत. कोणताही संबंध नसताना, कोणते कारण नसताना, कोणतीही माहिती न देता केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन धाडसत्र, अटकसत्र राबवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. हे काही योग्य वाटत नाही, असेही पाटील म्हणाले.
आपण सर्वांनी मोठी मेहनत घेऊन अपक्ष म्हणून संजयमामा शिंदे यांना करमाळ्यातून निवडून दिले. आज संजयमामा शिंदे लोकाभिमुख काम या भागात करत आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे. कोरोनाच्या काळात चांगले काम सरकारने केले. तसेच विकासकामात कोणताही खंड पडू नये याची खबरदारी घेतली. करमाळ्यातील पाण्याच्या व्यवस्थेसाठी वारंवार बैठका संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईत घेतल्या. येत्या काळात इथले पाण्याचे सर्व प्रश्न सोडवण्याचे काम केले जाईल, असे आश्वासनही पाटील यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.