Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खदखदणाऱ्या सोलापूर राष्ट्रवादीच्या भेटीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील!

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) गटनेते किसन जाधव यांनी प्रभागरचनेवरून माजी महापौर महेश कोठे यांच्यावर घेतलेले तोंडसुख, कोअर कमिटीतून डावललेले आनंद चंदनशिवे, दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलकडून सूनबाईंची उमेदवारी डावलले गेलेले जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, माजी आमदार राजन पाटील व कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्यात रंगलेले गटबाजीचे राजकारण यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्याची राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. अस्वस्थ राष्ट्रवादीचा कानोसा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) सोमवारी (ता. २१ फेब्रुवारी) आणि मंगळवारी (ता. २२ फेब्रुवारी) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. (NCP state president Jayant Patil on a visit to Solapur from Monday)

‘संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी' ही टॅगलाईन घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘परिवार संवाद' साधत राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे केले आहेत. सोलापूरच्या दौऱ्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा सोमवारचा दौरा सांगोल्यातून सुरू होऊन, माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ हे तालुके करत सोमवारी रात्री सोलापुरात पोचणार असल्याचे समजते. सोमवारी सोलापुरात मुक्काम करून मंगळवारी पुन्हा सोलापूर परिसरातील व शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाण्याची शक्‍यता आहे. माजी महापौर महेश कोठे यांच्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादीत आतापासून भांड्याला भांडे लागण्यास सुरूवात झाली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत गटबाजीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

विधान परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हास्तरीय सहकारी संस्थांच्या महत्वाच्या निवडणुका आगामी काळात होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला एकसंध करून सत्तेचे टायमिंग साधण्याचा ठोस प्रयत्न केले जाण्याची शक्‍यता आहे. सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा या तालुक्‍यातील राष्ट्रवादी गटबाजीने खदखदत आहे. या गटबाजीवर राष्ट्रवादी कसा तोडगा काढणार? की ‘डबल लाईन’चे राजकारण सुरूच ठेवणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

नव्या-जुन्यांचा संघर्ष

माजी महापौर महेश कोठे यांच्या रुपाने मास लिडर सोबत घेऊन सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादीला नव्या-जुन्याच्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे. कोठे राष्ट्रवादीत आल्यास सोलापुरातील गटबाजी थांबेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र गटबाजीचे नवे रुप आता दिसू लागले आहे. प्रभाग रचनेवरून इच्छुक अस्वस्थ आहेत, तर कोअर कमिटीत स्थान न मिळाल्याने ज्येष्ठ चिंतेत आहेत. राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश न मिळताही कोअर कमिटीत संधी मिळू शकते? या प्रश्‍नाने अनेकांच्या डोक्‍यातील गुंता वाढविला आहे.

जयंतरावांच्या दौऱ्याचे सुकाणू दीपक साळुंखेंच्या हाती

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी माजी आमदार तथा माजी अध्यक्ष दीपक साळुंखे यांच्याकडे आली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याची कल्पना व नियोजनातील सहभागासाठी ना अध्यक्ष बळिराम साठे यांना विचारात घेतले, ना कार्याध्यक्ष उमेश पाटील यांना विचारात घेतले. प्रदेशाध्यक्षांच्या नियोजनासाठी माजी अध्यक्ष दीपक साळुंखे यांच्यावर जबाबदारी आल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बदलाच्या प्रसंगाचीच अनेकांना या निमित्ताने आठवण झाली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या सोलापूर दौऱ्यात नव्या जिल्हाध्यक्षाचा प्रश्‍न येणार का? याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT