NCP
NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील वाद पेटला; जिल्हाध्यक्ष साठे, उमेश पाटलांची शरद पवारांकडे तक्रार

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मतदारसंघात झालेली पडझड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाऊले उचलत मंगळवेढा तालुका कार्यकारिणीत बदल केले. मात्र, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील आणि लतीफ तांबोळी यांनी हे बदल पदाधिकाऱ्यांना विश्वास न घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. (NCP's Solapur district president Baliram Sathe, Umesh Patil's complaint to Sharad Pawar)

तक्रारीच्या संदर्भात पवार यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर मंगळवेढ्यातील पक्षनेते अजित जगताप, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य विजय खवतोडे, नगरसेवक प्रवीण खवतोडे, प्रशांत यादव, बशीर बागवान, जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, शहराध्यक्ष संदीप बुरुकुल, भारत बेदरे, मुझम्मिल काझी, संजय पवार, ज्ञानेश्वर भगरे, सुनील डोके, दयानंद सोनगे, विठ्ठल आसबे, सोमनाथ बुरजे, शशिकांत साखरे, नजीर इनामदार, बंडू बेंद्रे, मिलिंद ढावरे, बसवेश्वर सोनगे यांच्या सह्या आहेत.

या निवेदनात या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मंगळवेढा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील व लतीफ तांबोळी हे दोघे राज्याचे स्वयंघोषित नेते असल्यासारखे वागत आहेत, असा आरोप केला आहे. (स्व.) आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून भगिरथ भालके यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. दुर्दैवाने या जागेवर आपण जिंकू शकलो नाही.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामानिमित्त भगिरथ भालके हे परगावी आहेत. कारखान्यातील अडचणीमुळे त्यांना मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधता आला नाही. ही संधी साधत तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष बदलण्याचा विडा उचलला. वास्तविक पाहता पक्ष अडचणीत असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान काही पदाधिकारी व त्यांचे नेते पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले होते. पण, राज्यात आलेली सत्ता पाहून पोटनिवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सध्या तेच मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये दरी पाडण्याचे काम करून पक्ष संपविण्याचे काम सुरू केले आहे, त्यामध्ये जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्षवाढीचे धोरण अवलंबावे हवे होते. पण, येथे मात्र गटबाजी वाढविण्याचे धोरण अवलंबिले जात असल्यामुळे या मनमानी कारभाराचा आम्ही पदाधिकारी निषेध करतो आहोत. या नव्याने दिलेली केलेली पदे आम्हाला अमान्य आहेत. ही चूक दुरुस्त न झाल्यास त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत बसू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात वरिष्ठ नेते लक्ष घालून हा वाद कशा पद्धतीने मिटवतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT