Nilam  Gorhe & Raj Thackeray Latest News
Nilam Gorhe & Raj Thackeray Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मगर आणि माकडाची गोष्ट सांगत निलम गोऱ्हेंनी राज ठाकरेंवर साधला निशाणा

सरकारनामा ब्यूरो

सांगली : जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी विविध भूमिका बदलून देखील मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) वारंवार अपयशी ठरत आहेत. सध्या भाजपला अनुकुल भूमिका राज यांनी घेतलेली आहे. कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखी वर्तवणूक ठेवून आंदोलन करणे योग्य नाही. असे परखड मत विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gohre) यांनी आज व्यक्त केले. त्या आज सांगली दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Nilam Gorhe & Raj Thackeray Latest News)

निलम गोऱ्हे म्हणाल्या, "सध्या केंद्र सरकारने वाय सुरक्षा योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जो बोलेल त्याला तातडीने ही सुरक्षा पुरविण्यात येत आहे. हे करण्यामागे राज्यातील गृह विभाग सक्षम नाही हे दाखविण्याचा केंद्राचा हेतू आहे. सध्या राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले असल्यास हा प्रकार गंभीर आहे. परंतु अनेक वेळा अशी धमकीची पत्रे लिहिणारे कोणी गुंड नसतात तर रात्रीच्या वेळी असे उपद्व्याप करीत असल्याचे आढळून आले आहे.

राज ठाकरे यांनी त्यांचा कोणी वापर तर करीत नाही ना, याचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी मुंबई महापालिकेच्या निवडणूका आल्या की शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. परंतु त्यातील एकही आरोप सिध्द झालेला नाही. मुंबई ही शिवसेनेची आहे आणि शिवसेना ही मुंबईची आहे. ही काळ्या दगडावरची केशरी रेष आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.’’अश्या शब्दात त्यांनी राज यांना सुनावले.

राणा दांप्त्याविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की,‘‘खासदार नवनीत राणा या उत्तम अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांना जसे संवाद बोलायला सांगण्यात येतात तशा त्या बोलतात. त्यामुळे त्यांचे म्हणणे गांभिर्याने घेण्याची गरज नाही. हनुमान चालीसाचा वापर कोणी आयुध म्हणून करीत असेल तर चुकीचे आहे. राजद्रोह कायदा रद्द करण्यास केंद्राचा विरोध आहे. मुळात राजद्रोह कशाला म्हणायचे हा केंद्र सरकारपुढील जटील प्रश्न आहे. केंद्र सरकारविरोधात वास्तवदर्शी भूमिका घेतल्याने अनेक पत्रकारांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या.’’ असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला

दरम्यान,गोऱ्हे यांनी मगर आणि माकडाची गोष्ट सांगत त्यांनी राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला. एकदा मगर आणि माकडात मैत्री झाली. माकडाने दिलेले आंबे मगरीने बायकोसाठी घरी नेले. त्यावर बायको मगरीला म्हणाली, इतकी गोड फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल. मला ते हवे. दुसऱ्या दिवशी मगरीने माकडाला घरी जेवायला बोलावले. त्याला पाठीवर घेवून तो नदीतून निघाला. मध्यभागी आल्यावर मगरीने माकडाला, माझ्या बायकोला तुझे ह्रदय हवे असल्याचे सांगितले. यावर त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला सांगितले की, अरेरे..! माझे हृदय तर झाडावरच आहे. ते आणण्यासाठी दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगरीच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगरीला म्हणाले, मित्रा तू विश्‍वासघातकी आहेस निघ आता..! अशी गोष्ट सांगत गोऱ्हेंनी राज आणि भाजपाच्या मैत्रीविषयी संदर्भ दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT