Nitin Kaka Patil, Madan Bhosale
Nitin Kaka Patil, Madan Bhosale facebook
पश्चिम महाराष्ट्र

'किसन वीर'वर एक हजार १७ कोटींचे कर्ज; मदन भोसलेंनी हिमालयात जावे....

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर एक हजार, 17 कोटी रुपयांचे कर्ज व देणी आहेत. संस्थेची कर्ज फेडण्याची शक्ती व नव्याने कर्ज उभारण्याची क्षमताच नष्ट झाली आहे. या दुर्दैवी परिस्थितीस विद्यमान अध्यक्ष मदन भोसले व त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी कारखाना व्यवस्थापनातून बाहेर पडावे किंवा हिमालयात जावे, आम्हाला काहीही फरक पडत नाही, असा टोला जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी मदन भोसले यांना लगावला आहे. दरम्यान, येणारा गळीत हंगामाचे नियोजन कसे असेल आणि ऊस उत्पादकांचे 55 कोटी रुपयांचे थकीत ऊस बील कधी देणार हे त्यांनी तातडीने स्पष्ट करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी नितीन पाटील, त्यांचे वडील- कारखान्याचे माजी अध्यक्ष कै. लक्ष्मणराव पाटील व बंधू आमदार मकरंद पाटील यांच्यावर टीका केली होती. याला आज नितीन पाटील यांनी उत्तर दिले. श्री. पाटील म्हणाले, माझ्याकडे किसन वीर साखर कारखाना आणि प्रतापगड युनिट व खंडाळा युनिट अशा तिन्ही कारखान्यांचे त्यांनीच प्रसिद्ध केलेले सन 2019-20 चे ताळेबंद व नफा- तोटा पत्रके आहेत. त्यातील आकडेवारीनुसार किसन वीर उद्योग समुहावर एकूण एक हजार 17 कोटी रुपयांची कर्जे व देणी याचा बोजा असून, यास सर्वस्वी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना जबाबदार आहे.

आता ३२५ कोटींचे कर्ज असल्याचे सांगून सभासदांची दिशाभूल करणाऱ्या मदन भोसले यांनी कारखान्यातून बाहेर पडावे किंवा राजकिय सन्यास घेऊन हिमालयात जावे. त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, असा टोला श्री. पाटील यांनी लगावला. सन 2003 पर्यंत आमचे वडील- कै. लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष होते. सत्तांतर होताना 2003 चा पहिला अहवाल जो स्वत: मदन भोसले यांनी प्रसिद्ध केला आहे. तो तात्यांच्या कारकिर्दीतील आहे. त्या अहवालामध्ये कारखान्यावर असलेली कर्जे 76 कोटी, 74 लाख, 68 हजार, 676 रुपयांची होती. 31 मार्च, 2003 रोजी जेव्हा सत्तांतर झाले, तेव्हा शिल्लक साखर 7 लाख, 40 हजार, 41 पोती इतकी होती.

त्या पोत्यांची ताळेबंदानुसार एकूण किंमत 91 कोटी, 53 लाख, 63 हजार, 987 रुपये इतकी होती. मात्र, त्यानंतरच्या काळात साखरेची दरवाढ झाल्यामुळे त्याही किमतीपेक्षा अधिक चढ्या भावाने ही साखर विकली गेली. याशिवाय तीन कोटी, 53 लाख, 23 हजार, 748 इतक्या रुपयांचे इतर उपपदार्थ शिल्लक होते. असे सगळे मिळून 95 कोटी, 6 लाख, 87 हजार, 736 रुपयांचा साखर व उपपदार्थांचा साठा शिल्लक होता. यावरून त्यावेळी कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होता आणि कारखान्याचे नेटवर्थही प्लस होते. कारखान्याच्या या भक्कम आर्थिक स्थितीमुळे पुढील दोनवर्षे कमी गळीत होऊनही कारखाना आर्थिकदृष्ट्या तग धरून राहिला.

त्यामुळे तात्यांच्या कारकिर्दीत कारखाना निश्‍चितच आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होता. आपल्याकडे कारखाना येताना डबघाईस आला होता, असे भोसले यांचे म्हणणे हे सभासदांची दिशाभूल करणारे आहे. तत्कालात ऊस बिलापोटीचा केवळ 50 रुपयांचा थकलेला हप्ता देण्यास झालेला विलंब हे एक नैमित्तीक कारण ठरले व सत्तांतर झाले. आम्ही सभासदांचा कौल शिरसावंद्य मानला आणि तेव्हापासून श्री. भोसले गेली सलग 17-18 वर्षे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्यावर बँकांची कर्जे, ठेवी, देणे व्याज, इतर देणी यांचा विचार करता एकूण एक हजार, 17 कोटी रुपयांच्या एकत्रित बोजा दिसतो.

केवळ किसन वीर सातारा सह. साखर कारखान्याचा 2020-21 च्या मदन भोसलेंनी सादर केलेल्या अहवालानुसार कारखान्यावर सर्व बँकांची मिळून 316 कोटी, 23 लाख रुपयांची कर्जे, इतर देणी 288 कोटी, 42 लाख व संचीत देणे व्याज 51 कोटी, 59 लाख असे एकूण 656 कोटी, 21 लाख रुपयांचा बोजा दिसत आहे. तो फेडण्यासाठी आज रोजी कारखान्याकडे अंदाजे 10 कोटी रुपयांची 33 हजार पोती आणि अंदाजे 40 लाख रुपये किंमतीचे अल्कोहोल शिल्लक आहे. अशा अवस्थेत शेतकर्‍यांचे थकलेले सुमारे 55 कोटी रुपयांचे ऊस बिल ते कसे देणार, याचे स्पष्टीकरण मिळणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर कामगारांचा पगार व बोनसपोटी देय असलेले अंदाजे 30 कोटी रुपये देणे बाकी आहे आणि येणार्‍या गळीत हंगामासाठी यंत्रणा उभी करण्याचे आव्हान आहे. या सर्वांचा मेळ विद्यमान अध्यक्ष आणि संचालक मंडळ कसा घालणार आहेत? याचे उत्तर मिळत नाही. आम्ही अडचणी आणल्यामुळे कर्ज मिळले नाही, असे मदन भोसले यांचे म्हणणे हे निखालस खोटे असून, स्वत:चा नाकर्तेपणा व गैरव्यवहार लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वर्षी किसन वीरच्या कार्यक्षेत्रात जवळपास 12 ते 13 लाख मेट्रीक टन ऊस उभा आहे. शेतकर्‍यांना त्याच्या गळीताची चिंता लागून राहीली आहे. कारखान्याने मागील हंगामातील सुमारे 55 कोटी रुपयांची एफ.आर.पी. अजून दिलेली नाही. त्यामुळे कारखान्यास गाळप परवाना मिळणार का याची शंका आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT