Solapur, 15 September : पक्षशिस्तीला प्राधान्य देणाऱ्या भाजपच्या ठाणे येथील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहिलेल्या सोलापूर महापालिकेतील २९ नगरसेवकांना पक्षाने नोटिसा बजावल्या आहेत. महापौर विनायक कोंड्याल यांना पूर्वपरवानगी असल्याने नोटिशीतून वगळण्यात आले आहे. संबंधित नगरसेवकांना मंगळवार सायंकाळपर्यंत (ता. १५ सप्टेंबर) खुलासा करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या उत्तरासह अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला महापालिकेत मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेचे सभागृह व प्रशासकीय कामकाज, प्रश्न मांडण्याची पद्धत, विकासकामे व सरकारी योजना मार्गी लावणे, नागरिकांशी संवाद, पक्षाची कार्यपद्धती आणि शिस्त याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानांतर्गत ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ६ व ७ सप्टेंबरला निवासी शिबिर घेण्यात आले.
सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील चार महापालिकांमधील सुमारे २०० भाजप नगरसेवकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ता. ५ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत शिबिरस्थळी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
सोलापूर मनपातील पहिल्या दिवशी ९४ पैकी १९ नगरसेवक गैरहजर होते. दुसऱ्या दिवशी महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह ११ नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. महापौरांनी पूर्वपरवानगी घेतली असल्याने उर्वरित १० नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामुळे दोन दिवसांत गैरहजर राहिलेल्या एकूण २९ नगरसेवकांना पक्षाच्या नोटिशीला सामोरे जावे लागले आहे.
पक्षनेते नरेंद्र काळे यांनी संबंधित नगरसेवकांना नोटिसा दिल्या आहेत. काही नगरसेवकांनी गैरहजेरीबाबत पूर्वसूचना दिल्याचे समजते. तरीही सर्व संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. गणेश चतुर्थीमुळे सोमवारीऐवजी उत्तर देण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
खुलासे प्राप्त झाल्यानंतर कोणाची गैरहजेरी पूर्वपरवानगीने होती आणि कोणी विनापरवानगी प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिले, याची छाननी होणार आहे. त्यानंतर पुढील शिस्तभंगाच्या कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रदेश कार्यालयास अहवाल पाठवणार : नरेंद्र काळे
याबाबत भाजपचे पक्षनेते नरेंद्र काळे म्हणाले, ठाण्यातील प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहिलेल्या २९ नगरसेवकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांनी मंगळवारपर्यंत उत्तर देणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांच्या उत्तरासह अहवाल प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.