Sagli Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Corporation : सांगली महापालिकेत भूकंप; आयुक्तांची १० अधिकाऱ्यांना नोटीस, काय आहे कारण?

Sangli Commissioner Sunil Pawar : ४८ तासांत कारणे दाखवा, अन्यथा कारवाई

Rahul Gadkar

Sangli Political News : सांगली महापालिकेत केंद्राच्या निधीतून सव्वा कोटी रुपयांची फूटपाथवर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची १३ कामे प्रस्तावित होती. त्या कामांचे अंदाजपत्रक दहा लाखांच्या आतील तयार केले. कंत्राटदारांसाठीच हा खटाटोप केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर आयुक्तांनी कडक पाऊल उचलले आहे. आयुक्तांनी तब्बल दहा अधिकाऱ्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. परिणामी सांगली शहरासह जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे. (Latest Political News)

सांगली महानगरपालिकेत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एक कोटी २५ लाख रुपयांची कामे 'मॅनेज' केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सांगली महानगरपालिका प्रशासन हादरले आहे. आयुक्त सुनील पवारांनी शहर अभियंतासह एकूण दहा अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. शहर अभियंत्यांची विभागीय चौकशी का करू नये, अशी नोटीस पवारांनी बजावली आहे. या नोटीसनंतर येत्या ४८ तासांत कारणे दाखवा, असे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅममधील (एन कॅप) हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला निधी देण्यात आला आहे. यातील सव्वा कोटी रुपयांची फूटपाथवर पेव्हिंग ब्लाॅक बसविण्याची १३ कामे प्रस्तावित करण्यात आली होती.

दहा लाखांच्या आतील अंदाजपत्रक तयार करून निविदा 'मॅनेज' केल्याचा आक्षेप नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी घेतला होता. त्याची दखल महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी घेतली. त्यानुसार संबंधित कामांची माहिती घेतली असता, संबंधित कामे 'मॅनेज' असल्याचे उघडकीस आले. यानंतर सर्व कामे आयुक्तांनी रद्द केली आहेत. (Maharashtra Political News)

तब्बल तेरा कामे 'मॅनेज' केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आयुक्त पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगर अभियंता परमेश्वर हलकुडे, भगवान पांडव, स्थापत्य अभियंता दीपक पाटील, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, प्रभारी शाखा अभियंता महेश मदने यांच्यासह चारही प्रभाग लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. येत्या ४८ तासांत नोटिशीवर खुलासा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त पवारांनी दिला आहे. आता यावर संबंधित अधिकारी काय उत्तर देणार, याकडे सांगलीकरांचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT