Pusesavali Villege sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pusesavali News : सीसीटिव्‍ही फुटेजच्या आधारे संशयितांना ताब्‍यात घेण्‍याचे सत्र सुरु; पुसेसावळीत तिसऱ्या दिवशीही बंद

Satara Police पुसेसावळी दंगलप्रकरणी पोलिसांनी पुसेसावळी, जयराव स्‍वामी-वडगावसह इतर गावांतील ३८ जणांना अटक केली आहे.

Umesh Bambare-Patil

Pusesavali News : पुसेसावळी दंगलप्रकरणी ताब्‍यातील युवकांचा घटनेशी कोणताही संबंध नसल्‍याचे सांगत येथील व्‍यापारी, नागरीकांनी आज बुधवारी बाजारपेठ बंद ठेवण्‍याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिसरातील व्‍यवहार बंद राहिले. त्यानंतर व्यापारी, नागरीक आणि वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्‍त बैठक झाली. गणेशोत्‍सावातील गैरसोय टाळण्‍यासाठी बंद मागे घेण्‍याचे आवाहन केले. या आवाहनानुसार व्‍यापारी, नागरीकांनी बंद मागे घेत गुरुवारपासून व्‍यवहार सुरळीत करण्‍याचा निर्णय घेतला.

समाजमाध्‍यमावरील आक्षेपार्ह मजकूरानंतर पुसेसावळी Pusesavali Villege येथे उसळलेल्‍या दंगलीत नूरहसन शिकलगार (वय २७) यांचा मृत्‍यु झाला होता. याप्रकरणी दाखल गुन्‍ह्‍याच्‍या तपासादरम्‍यान पोलिसांनी satara Police पुसेसावळी, जयराव स्‍वामी-वडगांवसह इतर गावातील ३८ जणांना अटक केली आहे. अटकेतील संशयितांची पोलिस कोठडीत चौकशी सुरु आहे.

पुसेसावळी परिसरातील सीसीटिव्‍ही फुटेजची पडताळणी करत इतरांना ताब्‍यात घेण्‍याचे सत्र पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसी कारवाईच्‍या भीतीने अनेकांनी पुसेसावळी येथून पोबारा केल्‍याचे समोर येत आहे. सध्‍यस्‍थितीत चौकशी, फुटेज पडताळणी व इतर तांत्रिक बाबींच्‍या आधारे पोलिसांचा तपास सुरु असून पुसेसावळी येथील जनजीवन काहीअंशी अजूनही विस्‍कळीत आहे.

बुधवारी सकाळी व्‍यापारी, नागरीक पुसेसावळी येथे जमले. त्‍यांच्‍याकडून दंगलीशी संबंध नसणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्‍यात येत असल्‍याचा आरोप झाला. अटकेतील संशयितांची सुटका होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्‍याचा इरादा व्‍यक्‍त करत नागरीक, व्‍यापाऱ्यांनी पोलिस अधिकारी यांची भेट घेतली.

नागरीक,व्‍यापाऱ्यांनी यावेळी अटक केलेल्‍यांना न्‍याय मिळावा तसेच प्रकरणाचा तपास निष्‍पक्ष करण्‍याची, घटनेशी संबंध नसणाऱ्यांना कोणताही त्रास पोलिसांकडून होणार नाही, अशी मागणी केली. अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक अश्‍‍विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सर्वांशी चर्चा केली.

म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पुर्णपणे निष्‍पक्ष सुरु असून कोणतीही कारवाई त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने करण्‍यात येत नाही. पूर्ण चौकशी, योग्‍य तपास आणि इतर बाबींची पडताळणी केल्‍याशिवाय कोणालाही ताब्‍यात घेतले जात नसल्‍याचे सांगितले. दोषी नसणाऱ्यांवर होणार नाही. कोणावरही अन्‍याय होणार नाही. तपास अत्‍यंत योग्‍य पध्‍दतीने सुरु असल्‍याचे सांगितले.

असे सांगतानाच वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गणेशोत्‍सव चार दिवसांवर येवून ठेपला आहे. नागरीकांना आवश्‍‍यक असणारे साहित्‍य खरेदी करता यावे, तसेच त्‍यांची गैरसोय टाळण्‍यासाठी निर्णय बदलणे आवश्‍‍यक आहे. बंद मागे न घेतल्‍यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी होण्‍याबरोबरच पुसेसावळीवर अवलंबून असणाऱ्या इतर गावांची गैरसोय होणार आहे. त्‍यामुळे नागरीक, व्‍यापाऱ्यांनी बंद मागे घेत प्रशासनास सहकार्य करणे आवश्‍‍यक असल्‍याचे आवाहन केले.

उपस्‍थित केलेल्‍या शंका व त्‍यावर पोलिसांनी दिलेली उत्तरे, तांत्रिक व इतर कायदेशीर बाबींची माहिती घेतल्‍यानंतर नागरीकांनी गुरुवारी सर्व व्‍यवहार पुर्ववत सुरु करण्‍याचा निर्णय घेतला. यानिर्णयामुळे पुसेसावळीतील जनजीवन पुर्वपदावर येण्‍यास मदत होणार असून परिस्‍थितीवर देखरेखीसाठी त्‍याठिकाणचा बंदोबस्‍त कायम आहे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT