Pandharpur, 11 April : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत हे उद्या (ता. १२ एप्रिल) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात राजकीय आणि इतरही घडामोडी घडत आहेत. मित्रपक्ष भाजपने उपमुख्यमंत्री शिंदे ज्या मार्गावरून कार्यक्रमस्थळी जाणार आहेत, त्या रस्त्यावरील खड्ड्यांत कुंकू, फुले आणि नारळ अर्पण करत त्याकडे लक्ष वेधले आहे.
निधी मिळविण्यात होणारी अडवाअडवी थांबवण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके, नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
भालके आणि सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आठ ते दहा नगरसेवकांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेतली. भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. तीर्थक्षेत्र विकास आघाडी आमची आहे, त्यामुळे व्हीप बजावण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही, असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते.
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या या नगरसेवकांनी भालकेंच्या निर्णयाला विरोध दर्शविल्याचे मानले जात होते. मात्र, त्याच दुसऱ्या दिवशीच अनिल सावंत यांनी या नगरसेवकांना माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घडवून आणली होती. पण त्यावेळी भालके गैरहजर होते, त्यामुळे भालके आणि सावंतांनी घेतलेल्या निर्णयावर नगरसेवक सहमत आहेत का, अशी चर्चा रंगली आहे.
एकीकडे भालके आणि सावंतांच्या शिवसेना प्रवेशात अडथळे येत असताना आता थेट भाजप विरोधात उतरल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे पंढरपूर शहरातील कार्यक्रमस्थळी ज्या स्टेशन रस्त्यावरून जाणार आहेत, त्या रस्त्यावरील खड्ड्यांचे हळदीकुंकू, नारळ आणि फुले वाहून मोठमोठ्या खड्ड्यांकडे लक्ष वेधले आहे.
याबाबत पंढरपूर भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी हे अनोखे आंदोलन केले आहे. नगरपालिका प्रशासानाने स्टेशन रोडवरील खड्डे तातडीने बुजवावेत; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या ज्या रस्त्याने पंढरपुरातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जात आहेत. त्या स्टेशन रोडवरील खड्ड्यांमध्ये हार घालून, फुले, हळी कुंकू वाहून नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.
नगरपालिका प्रशासनाने चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवून नागरिकांची सुटका न केल्यास नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.