Pandharpur Urban Bank Election
Pandharpur Urban Bank Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Urban Bank Election : भाजपच्या प्रशांत परिचारकांनी केला मनसे नेत्याचा करेक्ट कार्यक्रम...

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur Urban Bank Election : महाराष्ट्रात अनेक शहरात शाखा असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पॅनेलच्या विरोधात मनसे (MNS) नेते दिलीप धोत्रे यांनी पॅनेल उभे केले होते. तथापि उमेदवारी अर्ज छाननीमध्ये परिचारक यांच्या पॅनेलमधील सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले तर विरोधी धोत्रे यांच्या पॅनेल मधील सर्व अर्ज नामंजूर झाल्याने परिचारक समर्थकांनी गुलालाची उधळण करून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून परिचारक गटाचे वर्चस्व आहे. यापूर्वी अनेक वेळा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यंदा मात्र परिचारक यांच्या पॅनेलच्या विरोधात धोत्रे यांनी पॅनल उभे केले होते.

२८ रोजी निवडणूक (Election) निर्णय अधिकारी तथा सहायक उपनिबंधक सहकारी संस्था पी.सी. दुरगुडे यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. ॲड.के.बी.धारुरकर, ॲड.इंद्रजित परिचारक, ॲड.आदित्य धारूरकर यांनी परिचारक गटाच्यावतीने विरोधी उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेताला. या बँकेत नियमानुसार उमेदवारांच्या एक लाख रुपयांच्या ठेवी नाहीत, तीस हजार रुपयांचे शेअर्स नाहीत अशा प्रकारचे काही आक्षेप घेतले होते.

धोत्रे यांच्या बाजूनेही परिचारक यांच्या पॅनेलमधील काही उमेदवारांच्या विरोधात आक्षेप नोंदवण्यात आले होते. सहायक उपनिबंधक दुरगुडे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे आणि कागदपत्रांची पाहणी करून आज सकाळी परिचारक पॅनेलचे सर्व अठरा अर्ज मंजूर केल्याचे जाहीर केले.

विरोधातील सर्व सतरा अर्ज नामंजूर झाल्याने परिचारक समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण करून जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

नंतर परिचारक यांच्या वाड्यात युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या हस्ते परिचारक पॅनेलमधील सर्व उमेदवारांचे सत्कार करण्यात आले. निवडणूक कार्यक्रमानुसार १२ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या मुदतीत परिचारक पॅनेलकडून जादा भरण्यात आलेला एक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना परिचारक म्हणाले, ''विरोधकांनी व्यक्ती व्देषातून बँकेच्या निवडणुकीसाठी पॅनेल उभा करून निवडणूक लादण्याचा विनाकारण प्रयत्न केला होता. बँकेचे पन्नास हजाराहून अधिक सूज्ञ सभासद आहेत. त्यांचा बँकेच्या कारभारावर विश्वास आहे. त्यामुळेच विरोधकांच्या टीकेवर सभासदांनी विश्वास ठेवला नाही. बँक ही आर्थिक संस्था आहे. निवडणुकीचा आखाडा नाही. त्यामुळे विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. तथापि सर्वांना सोबत घेऊन या पुढील काळात बँकेला आणखी प्रगतिपथावर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील असे परिचारक यांनी नमूद केले.

परिचारक गटातील वैध अर्जापैंकी परिचारक पॅनेलकडून बँकेचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरीश ताठे, सतीश मुळे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, अनिल अभंगराव, मनोज सुरवसे, ऋषिकेश उत्पात, विनायक हरिदास, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, व्यंकटेश कौलवार, गजेंद्र माने, माधुरी जोशी, डॉ.संगीता पाटील यांची नावे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT