Yuvraj Patil
Yuvraj Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भगिरथ भालकेंच्या अडचणीत वाढ : विठ्ठल परिवारात २० वर्षांनंतर फूट!

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या (Pandharpur) सहकार क्षेत्रावर वर्चस्व गाजविणाऱ्या विठ्ठल परिवाराला गेल्या २० वर्षांनंतर फुटीचे ग्रहण लागले आहे. त्याला कारण ठरले आहे, गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (vitthal Sugar Factory) निवडणुकीचे. (कै.) औदुंबरअण्णा पाटील गटाने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा औदुंबरअण्णांचे नातू युवराज पाटील यांनी केली आहे. त्यामुळे भालके-काळे गटाला मोठा धक्का बसला आहे. औदुंबर अण्णा पाटील गटाने स्वबळाची भाषा केल्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे कारखान्यावर पुन्हा वर्चस्व राखू पाहणारे भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Pandharpur's Vitthal parivar split after 20 years; Difficulties of Bhalke group increased)

(कै.) औदुंबरअण्णा पाटील व (कै.) यशवंतभाऊ पाटील गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वाखरी येथील एका मंगल कार्यालयात विठ्ठल कारखाना निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. विठ्ठल कारखान्याची निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी. भालके-काळे गटाबरोबर युती करू नये, असा पवित्रा या बैठकीला उपस्थित शेकडो पदाधिकाऱ्यांनी घेतला. ॲड दीपक पवार यांनी पदाधिकाऱ्यांचा कल लक्षात घेऊन युती करावी किंवा नाही, याबाबत उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना हात वर करुन सहमती देण्याची विनंती केली. त्यावेळी भालके-काळे यांच्या सोबत युती करू नये, असे सर्वच उपस्थितांनी हात वर करुन सांगितले. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, सभासदांच्या भावनांचा आदर म्हणून विठ्ठलची निवडणूक औदुंबरअण्णा-यशवंत भाऊ पाटील गट म्हणून स्वतंत्रपणे लढवली जाईल, अशी घोषणा युवराज पाटील यांनी आपल्या भाषणातून लगेच केली. त्यामुळे परिचाराकांच्या विरोधात गेल्या २० वर्षापासून लढणाऱ्या विठ्ठल परिवारात पहिल्यांदाच विठ्ठ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने फूट पडली आहे.

या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले की, विठ्ठल परिवार एकसंघ राहावा; म्हणून आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केले. पण, भालके-काळे यांनी राजकीय डाव टाकून माझ्याच उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला. पदाची अपेक्षा मी कधीच ठेवली नाही. विठ्ठल साखर कारखाना सुरु व्हावा, यासाठी प्रयत्न केले. परंतु जवळच्या लोकांनीच माझ्या उमेदवारी अर्जावर अक्षेप घेऊन राजकारण केले आहे. त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. निवडणुकीमध्ये परिवर्तन केल्याशिवाय मी थांबणार नाही.

कामगार संघटनेने भालकेंची साथ सोडली

विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीत कामगारांची भूमिका महत्वाची मानली जाते. मात्र, या निवडणुकीत इंटक संघटनेने सत्ताधाऱ्यांची साथ सोडून युवराज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. इंटकचे अध्यक्ष रामदास अंध यांनी ही घोषणा केली. कामगारांचे मागील अनेक महिन्यांचे वेतन कारखान्याकडे थकीत आहे, त्यातूनच विठ्ठलच्या कामगार संघटनेने आपला पाठिंबा युवराज पाटील यांना दिला आहे.

दोन्ही पाटलांचे भालके-काळे गटाला कडवे आव्हान

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, हे आता निश्चित झालेले आहे. युवराज पाटील, गणेश पाटील, दीपक पवार यांनी स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली आहे. त्यातच डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील हेही कारखान्याची निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे सत्ताधारी भालके-काळे गटापुढे दोन्ही पाटलांचे मोठे आव्हान असणार आहे. त्यातच विठ्ठल परिवारात फूट पडल्यामुळे हे आव्हान आणखीनच कठीण होऊन बसले आहे. सत्ताधारी भालके -काळे गटाचे अनेक शिलेदार दोन्ही पाटलांच्या गोठात सहभागी झाले आहेत. त्याचाही मोठा फटका भालके -काळे यांना बसला आहे. दरम्यान कल्याणराव काळे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्टपणे जाहीर केली नाही. काळे ऐनवेळी कोणती भूमिका घेतात यावरही भालके गटाची भिस्त अवलंबून राहणार आहे.

विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक, बाळासाहेब पाटील, दगडू हाके, हणमंत पवार, दामू पवार, विलास साळुंखे, दिलीप रणदिवे, रामदास चव्हाण, बाळासाहेब गडदे, अमरजीत पाटील, मोहन बागल, बजरंग बागल,संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT