Parivartan Mahashkti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Parivartan Mahashkti : कोल्हापुरात परिवर्तन महाशक्ती राजकीय धमाका करणार, हादरा महायुती की ‘मविआ’ला कुणाला बसणार?

Parivartan Mahashkti third Front : तिसरी आघाडी कोल्हापूर जिल्ह्यात काय भूमिका घेणार याबाबत अजूनही उत्सुकता लागून राहिली आहे.

Rahul Gadkar

कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीत दोन उमेदवारांची नावे आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात भाजपकडून दुसरी यादी आणि महाविकास आघाडीचीही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवाय महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसात जाहीर होणार आहे. मात्र निर्माण झालेली तिसरी आघाडी कोल्हापूर जिल्ह्यात काय भूमिका घेणार याबाबत अजूनही उत्सुकता लागून राहिली आहे.

कोल्हापुरात महायुती आणि महाविकास आघाडीचे संपूर्ण उमेदवार जाहीर झाल्यानंतरच महाशक्ती आपला डाव टाकणार आहे. कारण दोन्ही आघाड्यांमधील बंडखोर आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न महाशक्तीचा खास करून स्वराज्य पक्षाचा आहे. जर असे उमेदवार गळायला लागल्यास त्याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो. अशाच चेहऱ्यांचा शोध महाशक्ती करत आहे. त्यातून काही बंडखोरांशी चर्चा झाली असून अनेक जण मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील तिसऱ्या आघाडीतील महाशक्तीचे प्रमुख दोन नेते हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात महाशक्तीची भूमिका काय असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता आणि उत्कंठा लागून राहिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात संभाजीराजे छत्रपती यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हे स्वतः शिरोळच्या मैदानातून उतरणार की कार्यकर्त्याला संधी देणार ही भूमिका देखील गुलदस्त्यात आहे. शिवाय महाशक्तीने आज पहिली यादी जाहीर केली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातून एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघापैकी शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला जाण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात संभाजी राजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) भूमिकेकडे लक्ष आहे. कारण खासदार शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसचे नेते आहेत. शिवाय संभाजी राजे यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी माधुरीमाराजे यांची कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी अजून भूमिका स्पष्ट केली नाही.

मात्र काँग्रेसने उमेदवारीचा वेगळा विचार केल्यास त्या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती या सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देऊ शकते. त्याबाबतची चाचणी देखील स्वराज्य संघटनेकडून करण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर, चंदगड, राधानगरी विधानसभा मतदारसंघात काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पूर्व निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. असेच उमेदवार स्वराज्य आणि परिवर्तन महाशक्तीच्या वाटेवर आहेत. कोल्हापूर उत्तरमधून माजी नगरसेवक, कोल्हापूर दक्षिणमधून एका मोठ्या गटाचा नेता, राधानगरीमधून एका पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष, चंदगडमधून दोन ते तीन मोठे पदाधिकारी यांची चाचपणी केली आहे. शिवाय हातकणंगलेमध्ये देखील माजी आमदार परिवर्तन महाशक्तीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते.

या सर्व मतदारसंघापैकी एका मतदारसंघातील निवडून येण्यासारखा पदाधिकारी परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. तर इतर ठिकाणी निवडून येण्याची क्षमता नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभवाची झळ देणारा परिवर्तन महाशक्तीचा उमेदवार ठरू शकतो. अशाच चेहऱ्यांचा शोध परिवर्तन महाशक्तीने खास करून स्वराज्य पक्षांनी घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT