Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil Interview: राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलेल्या कोणत्या योजना ठरणार गेम चेंजर?

Radhakrishna Vikhe Patil Interview: विरोधक गोंधळलेले, राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता

सरकारनामा ब्यूरो

Radhakrishna Vikhe Patil Interview: केंद्र सरकार संविधान बदलणार, या सारखे फेक नॅरेटिव्ह सेट करून विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत मतदारांची दिशाभूल केली, तरीही महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती आणि महाविकास आघाडीत केवळ एक टक्का मतांचा फरक राहिला.

विधानसभा निवडणुकीत शेतीला संपूर्ण वीज माफी आणि लाडकी बहीण, यांसारख्या योजना गेम चेंजर ठरतील, याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.

त्यामुळे आमच्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात ते एकीकडे न्यायालयात जातात, तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष आपल्या पंचसूत्रीत महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा करतो.

विरोधक गोंधळलेले आहेत. कारण राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आहे, असा विश्वास राज्यातील भाजपचे प्रमुख नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा राज्यात होत आहेत. त्यांच्या भाषणांतून भाजपची भूमिका कशा पद्धतीने मांडली जात आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सामान्य जनतेच्या कल्याणाची भाषा बोलत आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात गोरगरीब जनतेसाठी देशभर तीन कोटी घरे बांधली गेली. अनेक लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.

स्वच्छतागृहांची उभारणी मोठ्या प्रमाणावर झाली. देशभर रस्त्यांचे जाळे विणले गेले. भारताचे सामर्थ्य वाढले. आता ‘भारत बोलतो आणि जग ऐकते.’ पूर्वी असे चित्र दिसत नव्हते. ‘मोदी है तो मुमकीन है’ हे अनेकदा सिद्ध झाले.

जनतेच्या मनात मोदींबाबत आकर्षण आहे. त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. शहा हे कणखर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीची चांगली जाण आहे. केंद्रीय सहकारमंत्री या नात्याने त्यांनी सहकाराला बळकटी देण्याचे काम केले.

केंद्र सरकारने उसाला एफआरपी आणि साखरेला शाश्वत भाव दिला. ऊस उत्पादकांच्या कल्याणासाठी पावले उचलली. इथेनॉलनिर्मितीला आणि ते पेट्रोलमध्ये मिसळवून वाहनांसाठी वापराला चालना दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले. हे दोन्हीही नेते सामान्य माणसांच्या हिताची भूमिका मांडत आहेत.

राज्यातील महायुतीच्या प्रमुख घटक पक्षांत सर्वकाही अलबेल आहे, असे दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार वेगळी भूमिका मांडताना दिसतात?

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात वैचारिक समानता आहे. अजित पवार यांच्या पक्षाची विचारधारा वेगळी आहे. समान कार्यक्रमाच्या आधारे ते आमच्या सोबत आले आहेत.

त्यामुळे एखाद्या मुद्यावर त्यांनी भिन्न भूमिका मांडली, तर त्यात वावगे काही नाही. महाविकास आघाडीत देखील सर्वकाही अलबेल नाही. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले.

या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणे दूरची गोष्ट, त्यांचे नाव देखील मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात नाही. महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. परस्पर विरोधी विधाने केली जात आहेत.

महायुतीसाठी राज्यात कसे वातावरण आहे?

आम्ही कल्याणकारी योजना, केलेली विकासकामे आणि घेतलेले महत्त्वाचे निर्णय जनतेसमोर मांडून निवडणुकीला सामारे जात आहोत. महाविकास आघाडीकडे सांगण्यासारखे काहीही नाही.

त्यांचा अडीच वर्षांचा गोंधळाचा आणि घोटाळ्यांचा कार्यकाल जनता विसरलेली नाही. आमच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांसारखे कर्तृत्व सिद्ध केलेले नेते आहेत. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवणारे आम्ही नाहीत.

अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि तुमच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर आणि निवडणुकीवर काय परिणाम होईल?

थोरात हे भ्रम पसरवतात. वस्तुस्थिती फार वेगळी आहे. वाळू आणि खडी माफियांच्या जोरावर ते अहिल्यानगर जिल्ह्यात राजकारण करायचे. मी महसूलमंत्री झाल्यानंतर या माफियांना चाप लावला. त्यांच्यावर दहशत निर्माण झाली. थोरात म्हणतात, मी दहशतीचे राजकारण करतो. होय करतो, मी दहशत. माफियांवर माझी दहशत निर्माण झाली असेल, तर थोरातांनी त्याचे स्वागत करायला हवे.

ते म्हणतात शिर्डी विधानसभा मतदारसंघात माझ्या ताब्यात असलेल्या गणेश कारखान्याची निवडणूक त्यांनी जिंकली. प्रत्यक्षात हा कारखाना सातत्याने शेजारचे माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांच्या गटाच्या ताब्यात होता.

तो त्यांच्या हातून बंद पडला म्हणून गेली आठ वर्षे मी तो चालविला. त्याचे नूतनीकरण केले. मी त्यावेळी पुढाकार घेतला नसता, तर या कारखान्याचा लिलाव झाला असता. एक सहकारी साखर कारखाना मी वाचवला. आम्ही सभासद वाढविले असते, तर तेथे विरोधकांची डाळ शिजली नसती.

विखे पाटील म्हणाले...

- बंडखोरीने ग्रासलेल्या महाविकास आघाडीत एकाचवेळी दहा-दहा नेते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पहात आहेत.

- महाविकास आघाडीकडे विकासाचा कुठलाही कार्यक्रम नाही.

एवढे गोंधळेले विरोधी पक्ष पाहिले नाहीत...

मी सलग सात वेळा विधानसभेवर निवडून जात आहे. मात्र, एवढे गोंधळलेले विरोधी पक्ष पाहिले नाहीत. विकासाच्या मुद्यावर प्रचार करण्याऐवजी जातीपातीची समी‍करणे मांडून निवडणुका जिंकण्याचे स्वप्न ते पहात आहेत.

प्रचाराची पातळी खालविण्यास विरोधी पक्षातील काही नेत्यांची वादग्रस्त विधाने नेहमीच कारणीभूत ठरत आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT