MLA Rohit Pawar
MLA Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar News : पाटेगाव-खंडाळा 'एमआयडीसी'साठी आमदार रोहित पवार आक्रमक ; मंत्रालयासमोर...

सरकारनामा ब्यूरो

Pategaon Khandala MIDC ncp mla Rohit Pawar aggressive : अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी होळकर असे केले जाणार आहे. अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने चौंडी येथे गुरुवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचं नामांतराची घोषणा केली. या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे.

पण या कार्यक्रमात धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कुठलीही घोषणा केली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवारांनी शुक्रवारी अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

"आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. केंद्रामध्ये नऊ वर्षापासून भाजपचे सरकार आहे. मात्र राज्य सरकारने वेळोवेळी धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, अशा घोषणा करत असतानाच हे आरक्षण पूर्णत्वास नेण्यास राज्यातील भाजप याला यश आलेले नाही. राज्य सरकारचे केंद्र सरकार ऐकत नाही का," असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.

बारामती मधील कॉलेजला सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिलं, त्याचे आम्ही स्वागत करतो, मात्र नगर जिल्ह्यात अजून एका मेडिकल कॉलेजला कर्जत जामखेड मतदारसंघात परवानगी हवी होती, अशी अपेक्षा रोहित पवारांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघातील दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटेगाव-खंडाळा या ठिकाणी एमआयडीसी साठी मोठे प्रयत्न केले. या निमित्ताने मध्यवर्ती क्षेत्राची पाहणी सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 2021 मध्ये झाली. त्यानंतर 2022 ला ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर जुलै 2022 मध्ये उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव-खंडाळा येथील 458.72 हेक्टर क्षेत्राला एमआयडीसीला तत्वतः मान्यता देण्यात आली. मात्र त्यानंतर पुढील कोणताही आदेश सरकारच्या वतीने घेण्यात आला नाही.

निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

आता याबाबत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने शिंदे फडवणीस सरकार घोषणा करेल अशी अपेक्षा होती. या बाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना आपण निवेदन देत निर्णय न झाल्यास उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र ही घोषणा न झाल्याने आता येणाऱ्या 26 जूनपर्यंत अर्थात राजश्री शाहू महाराज जयंती दिनापर्यंत सरकारने पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी बाबत निर्णय न घेतल्यास मंत्रालयासमोर मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसह आपण स्वतः उपोषणाला बसणार असल्याचं रोहित पवार यांनी जाहीर केलं.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT