prajakt tanpure Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'निवांत झोप येण्यासाठी भाजपमध्ये गेलेले लोक आता दुसऱ्यांच्या बॅलेन्सशीट बद्दल बोलतात'

महाराष्ट्रातील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Minister of State Prajakt Tanpure ) यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( MP Dr. Sujay Vikhe Patil ) यांना प्रतिउत्तर दिले आहे.

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : भाजपने तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीतील नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन केले होते. या प्रसंगी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्यात येत नसल्याबाबत गंभीर आरोप केले होते. या आरोपात त्यांनी मुश्रीफ हे स्वतःचे बॅलेंसशीट तपासत असल्याने येऊ शकत नसल्याचे सांगितले होते. यावर महाराष्ट्रातील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रतिउत्तर दिले आहे. 'People who went to BJP to get a good night's sleep now talk about other people's balance sheets'

प्राजक्त तनपुरे यांनी नगर तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, या मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं की, "पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सध्या त्यांचे बॅलन्स शीट तपासण्यात व्यस्त आहेत, त्यांना ते तपासू द्यात. त्यानंतर ते जिल्ह्यात येतील,' अशी टीका खासदार विखे यांनी केली होती. या टिकेला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. " पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे काम अत्यंत चांगले असून त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे'

तनपुरे म्हणाले, काही लोक निवांत झोप येण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि असेच लोक आता इतरांच्या बॅलन्स शीटबाबत बोलत आहेत. भाजपने आंदोलनाचा फार्स बंद करावा, आदल्या दिवशी राज्य शासनाने शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी भाजपच्या वतीने उपोषण करण्यात आलं. भाजपवाले हे सकाळी नाष्टा करून आले आणि दुपारी जेवण करायाला घरी निघून गेले. उपोषण करायचं, निदान लोकभावनेचा आदर करून तरी भाजपने उपोषण करायला हवं होतं' अशा शब्दात मंत्री तनपुरे यांनी भाजपच्या उपोषण आंदोलनाची खिल्ली उडवली.

ते पुढे म्हणाले, आम्हाला शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची जाणीव आहे. मात्र, भाजपने नाटकी आंदोलन करणं थांबवले पाहिजे. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. खासदार विखेंनी केंद्र शासनाकडून निधी आणून दाखवा. केंद्र सरकार गुजरात राज्याला वादळाच्या नुकसानीच्या वेळेस भरपाईसाठी निधी देत आहे. परंतु, महाराष्ट्राला निधी देत नाहीत. नगर-मनमाड महामार्गाला निधीची गरज आहे. डॉ. विखे यांनी या महामार्गाला निधी आणून काम करून दाखवावे, असे आव्हान तनपुरे यांनी दिले.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी अभ्यास करून बोलावं

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी "राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून कोळसा पुरवठा थांबविण्याची विनंती केली होती' या वक्तव्याबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, हे चुकीचे आहे. राज्य सरकारने अशी विनंती केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अभ्यास करून बोलावे, असा सल्ला राज्यमंत्री तनपुरे यांनी दिला.

केंद्राचा महावितरणच्या खासगीकरणाचा डाव

केंद्र सरकारकडून महावितरणचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे, मात्र असे झाले तर शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून वीज बिल वसुली 'पठाणी' पध्दतीने केली जाईल. सध्या महावितरणकडून कोठेही 'पठाणी' वीज बिल वसुली केली जात नाही. कोणालाही सक्ती केली जात नाही. मात्र, जर महावितरणचे खासगीकरण झाले तर सर्वात जास्त नुकसान हे सर्वसामान्यांचेच होईल. त्यामुळे महावितरणचे काम अतिशय उत्तम सुरू आहे. नागरिकांनी देखील वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे नियमानुसार लॉकडाऊन

जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन केल्याबाबत खासदार विखे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला होता. यावर प्राजक्त तनपुरे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेल्या अधिकारांनुसार त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यात कोणतेही राजकारण नाही असं तनपुरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT