Phaltan Doctor Death Case : पोलीस उपनिरीक्षकाच्या आणि घरमालकाच्या मुलाच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून फलटणच्या सरकारी उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. तर या घटनेनंतर फलटणमधील पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांसाठी काम करतंय की राजकीय नेत्यांच्या फायद्यासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकीकडे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या घटनेमुळे आयुष्यभर भाऊबीज साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा पुतळा फलटण उपजिल्हा रुग्णालयात उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, डॉक्टरची आत्महत्या झालेला दिवस फलटणसाठी काळा दिवस आहे. मृत डॉक्टरचा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात अर्ध पुतळा उभारणार आहे. फलटण तालुक्यातील डॉक्टरच्या आत्महत्येमुळं तालुक्यातील दहशत संपवली. नाईक निंबाळकर या ब्रँडचे वाटोळं केलं आहे.
या ब्रँडला पुन्हा मोठा करण्यासाठी मी प्रयत्न करणार असून ही लढत भाऊबीजेला सुरु झाली आहे. त्यामुळे मी देखील भाऊबीज साजरी करणार नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. शिवाय या मुलीचा अर्ध पुतळा सरकारने नाही केला तर मी माझ्या स्वखर्चातून उभा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
तसंच फलटण तालुक्यात सच्ची माणसे आहेत. वारकरी पंथाची माणसे आहेत हे आपल्याला सांगाव लागेल, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. तर मी यापुढे भाऊबीज साजरी करणार नाही. त्या मुलीची आपण सर्व आठवण ठेवा असंही ते यावेळी म्हणाले.
फलटणमधील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी डॉक्टर स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहिली ज्यामध्ये तिने आपल्या मृत्यूला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर हे दोघे कारणीभूत असल्याचं लिहिलं.
धक्कादायक बाब म्हणजे तिने यापूर्वीही एका खासदाराचा पीएने फोनवरून पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत असल्याची तक्रार केली होती. मात्र तिच्या तक्रारीची दखल कोणी घेतली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही रुग्ण फिट असल्याचा अहवाल देण्यासाठी फोन केला होता. याच दबावातून तिने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडूनही केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.