Narendra Modi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

PM Modi News: मोदींच्या गॅरंटीवर वातावरण टिकवून ठेवण्याचे महायुतीसमोर आव्हान

Maharashtra Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेला हल्लाबोल आणि मोदींची गॅरंटी या विषयांवर केलेल्या भाषणामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांची चर्चा आता जास्त रंगू लागले.

Rahul Gadkar

Kolhapur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सभा झाली. या सभेसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तुफान गर्दी झाली होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची अडचण निर्माण झाली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेमुळे बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेला हल्लाबोल आणि मोदींची गॅरंटी या विषयावर केलेल्या भाषणामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांची चर्चा आता जास्त रंगू लागले. आता सभेमुळे निर्माण झालेले वातावरण टिकवून ठेवण्याबरोबरच सभेतील गर्दीचे मतांत रूपांतर करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात (Kolhapur) तपोवन मैदानावर सभा झाली. सभेला अपेक्षित असा प्रतिसादही मिळाला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोकांनी हजेरी लावली. त्यात महायुतीतील आगामी विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनीही यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.

सद्य:स्थितीत कुणाला मतदान करायचे याचा ८० ते ८५ टक्के लोकांचा निर्णय झाला आहे. उर्वरित १५ ते २० टक्के लोक अशा गर्दीवर मतदान करतात हा अभ्यास आहे आणि हीच मते निर्णायकही असतात. तथापि, आजच्या सभेनंतर प्रत्यक्ष मतदानाला अजून दहा दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे यापुढील काळात हेच वातावरण टिकवून ठेवण्याबरोबरच सभेला झालेल्या गर्दीचे मतांत रूपांतर करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.

आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी देश, राज्य पातळीवरील अनेक प्रश्‍नांना हात घातला. त्याचवेळी ते स्थानिक उमेदवारांवर बोलतील अशी अपेक्षा होती; पण त्यावर त्यांनी भाष्य केले नाही.

त्यांनी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज असो किंवा हातकणंगलेतील आघाडीच्या उमेदवारांवर थेट टीकाही केली नाही किंवा दोन उमेदवारांची तुलनाही केली. याउलट महायुतीच्या दोन उमेदवारांना मत म्हणजेच मला मत, असे सांगत त्यांनी आपल्याच करिष्म्यावर जास्त भर दिला.

आतापर्यंत निवडणुकीचे दोन टप्पे देशभर झाले आहेत. त्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर मतांचा टक्का घटला आहे. झालेल्या मतांत विशिष्ट समूहाची टक्केवारी जास्त असल्याचे पुढे आले आहे.

घटलेल्या मतांच्या टक्क्यांचा धोका असल्याचा अंदाज आल्यानेच मोदी यांनी कर्नाटक सरकारने मुस्लिम आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका करून वादाला तोंड फोडले आहे. त्यातून आपल्याला आवश्यक असणाऱ्या मतांची टक्केवारी वाढवणे हाही भाग असू शकतो.

दक्षिणेच्या राज्यात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले आहे. त्यातून काँग्रेसला दक्षिणेचा मिळून स्वतंत्र देश करण्याचा नवा आरोप त्यांनी केला, त्यातून देशातील बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षितता या मुद्द्यांकडे दुर्लक्षच केले. सद्य:स्थितीत राहुल गांधींविरुद्ध नरेंद्र मोदी असा वाद दिसत नाही.

हा वाद पुढे आला तर त्यात मोदीच सरस ठरतात. विरोधी आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवारच जाहीर केलेला नाही, त्यामुळेच देशात दरवर्षी नवा पंतप्रधान विरोधकांकडून दिला जाईल, असा आरोप मोदी यांच्याकडून करण्यात आला. त्याला कर्नाटक पॅटर्नची जोड देऊन विरोधकांच्या संविधान बचाव, लोकशाही बचाव या घोषणेला छेद देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

काँग्रेस, सेना नेतृत्‍वावर निशाणा

थेट उमेदवारांची तुलना किंवा काँग्रेस उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना डिवचले तर ते अंगावर येऊ शकते, त्यामुळे मोदी यांनी संपूर्ण भाषणात उमेदवारांवर थेट आरोप न करता काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्‍वावरच टीका करणे पसंत केले. दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार आहेत, पण शिवसेना फुटलेली आहे आणि खरी शिवसेना कोणाची याची जाणीवही मोदी यांना आहे.

शिवसेनेतील फुटीतून उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांना उद्धव ठाकरेंची भूमिका आवडली असती का? असा प्रश्‍न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. यातून काँग्रेससोबत जाण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT