Kolhapur police ban welcome mandaps on Ganesh Visarjan route sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : पोलीस-राजकीय नेते आमनेसामने! कोल्हापूरात विसर्जन मार्गावर स्वागतमंडप उभारण्यास बंदी! वाद चिघळणार?

Police vs Political Leaders Ganesh Visarjan Route: गणेश विसर्जन मिरवणुकीत स्वागत मंडप उभारण्यास पोलिस प्रशासनाकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय नेते विरुद्ध पोलीस प्रशासन वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : गणेश विसर्जन काळात पुन्हा एकदा राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन आमने सामने येण्याची शक्यता आहे. विसर्जन मार्गावर स्वागत मंडप उभारण्यासाठी सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांना मंडप घालण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने मनाई केली आहे.

एका राजकीय पक्षाकडून मंगळवारी स्वागत मंडप उभारण्याचे काम सुरू असताना महापालिकेकडून त्याला विरोध करण्यात आला त्यामुळे राजकीय नेते विरुद्ध पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्याचा उद्रेक आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी देखील गणेश विसर्जन मिरवणुकीत मिरवणूक रेंगाळल्यामुळे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर यंदा पोलीस प्रशासनाने स्वागत मंडप उभारण्यास मनाई केल्याने पुन्हा एकदा राजकीय नेते आणि पोलीस प्रशासनात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिन खांबी गणेश मंदिर पापाची तिकटी ते गंगावेश रोडवर अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून तरुण मंडळांसाठी विसर्जन मिरवणुकीत स्वागत मंडप उभारण्यात येतो. दरवर्षी उभारण्यात येणाऱ्या या स्वागत मंडपामुळे मिरवणूक रेंगाळते ,असा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून मंगळवारी कोल्हापूर महापालिकेकडे पत्रव्यवहार करून त्या संदर्भात माहिती दिली. संदर्भातील पत्र कोल्हापूर महानगरपालिकेला मिळताच महानगरपालिका देखील ॲक्शन मोडवर आली आहे. ज्या सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी महानगरपालिकेकडे स्वागत मंडप उभारण्यासाठी परवानगी मागितली त्यांची परवानगी नाकारण्यात आली.

याबाबत शहर पोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनीही सहायक आयुक्त दुधाणे यांच्याशी मंडपांना परवानगी न देण्याबाबत चर्चा केली. दरम्यान महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता सर्वच राजकीय पक्ष यामध्ये उतरण्याची शक्यता आहे.

बैठकीत होणार अंतिम निर्णय

वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांना सभा मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्या संदर्भातील बैठक आज होणार आहे. प्राथमिक टप्प्यात पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर या अगोदर स्वागत मंडप उभारण्यात येत होते. मात्र आता गंगावेश परिसरात राजकीय पक्षांना सभामंडप उभारण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र वाहतुकीला कोणतीच अडचण येणार नाही याची काळजी घेऊन त्यासाठी परवानगी देणार येणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT