Ravana Dahan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रावण दहनातील 'घराणेशाही'मुळे काही काळ तणाव

रावणाच्या छातीवर स्लोगन लिहून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न श्रीरामपूर शहरात झाला.

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

Shrirampur : दसऱ्याच्या दिवशी देशातील विविध ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम झाले. मात्र रावणाच्या छातीवर स्लोगन लिहून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न श्रीरामपूर शहरात झाला. यावर पोलिसांनी आक्षेप घेतला होता. मात्र राजकीय व्यक्तींनी पोलिसांना याबाबत स्पष्टीकरण दिल्यावर उत्साहात रावण दहन झाले.

रावणाच्या छातीवर लिहिलेली 'फक्त घराणेशाही' या स्लोगनने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, स्लोगनची असलेली परंपरा पोलिस अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर हा तणाव निवळला, तर श्रीराम तरुण मंडळाने 'हरलो तरी चालेल, पण मैदान गाजविता आले पाहिजे, मग समोर कोणीही असो' या ओळीतून मातब्बर राजकारण्यांना व राजकारणात येऊ पाहणाऱ्या गुंड प्रवृत्तींना एक प्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.

येथील बेलापूर रस्त्यालगत असलेल्या कालव्याजवळ रावणाचे दहन केले जाते. परिवर्तन समितीच्या वतीने आयोजित रावण दहनाचा शुभारंभ आमदार लहू कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिवसेनेचे सचिन बडदे, 'आप'चे तिलक डुंगरवाल, कामगार नेते नागेश सावंत, भाजपचे बंडू शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. श्रीराम तरुण मंडळाच्या रावणाचे दहन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, ससाणे, अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, विशाल अंभोरे, कुणाल करंडे, सुरेश सोनवणे, भगवान कुंकूलोळ, प्रेमचंद कुंकूलोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दसऱ्याच्या दिवशी होणारे रावण दहन श्रीरामपूरकरांसाठी एक उत्सुकतेचा विषय असतो. कारण त्याच्या छातीवर लिहिलेले स्लोगन वर्षभरातील घडलेल्या राजकीय घडामोडींवर केलेली मार्मिक टिपणी असते. परंपरेने श्रीराम चौक मित्र मंडळाच्या वतीने रावण दहनाचे आयोजन केले जात होते. त्यात अलिकडच्या काळात परिवर्तन समितीची भर पडली. काल मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही रावणाचे दहन झाले. परिवर्तन समितीने घराणेशाही भोवती फिरणाऱ्या राजकारणावर टिपणी करत 'फक्त घराणेशाही' या स्लोगनच्या माध्यमातून आदिक, ससाणे, मुरकुटे व विखे या पारंपारिक राजकारण्यांवर निशाणा साधला. मात्र, असे असताना राज्यातील राजकीय वातावरणाला अनुसरून केलेले हे स्लोगन पोलिस अधिकाऱ्यांना मात्र भावले नाही. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील डीजे बंद करत छातीवरील स्लोगन हटविण्याचा फतवा काढला. यावेळी परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही लिहिलेले स्लोगन राजकारणीही खेळाडूवृत्तीने स्वीकारतात व ही परंपरा गेली अनेक वर्षापासून सुरू असल्याच्या केलेल्या खुलाशानंतर निर्माण झालेले गैरसमज दूर होऊन हा सोहळा पार पडला. यावेळी श्रीरामपूरकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावीत रावण दहनाचे क्षण मोबाईलमध्ये साठविला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT