गेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभवाची धूळ चारली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी निर्णायक मतं घेतली होती, त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. त्यामुळे ती पराभवाची सल काँग्रेसला अजूनही खूपत असल्याचे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यामधून दिसते. सध्या महाविकास आघाडीत वंचित आणि महाविकास आघाडीची एकत्र येण्याबाबत बोलणी सुरू आहे, असे असताना प्रणिती शिंदे यांची अशी वक्तव्यं वंचिताच्या महाविकास आघाडीत प्रवेशासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
"मागच्या निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होतं, जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो, डॅमेज करतो त्यामुळे कोणीही निवडून येत नाही. ज्यामुळे जो विरोधात आहे, तो निवडून येतो म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका," असा सल्ला प्रणिती शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.
सोलापूर लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेच असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असू शकते. प्रणिती शिंदे यांना भाजपत घेऊन सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, अशा चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले होते. त्यामुळे आमदार प्रणितींना प्रत्येक कार्यक्रमात मी कोठेही जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आवर्जून सांगावे लागत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने प्रणिती शिंदेंनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी कॉर्नर बैठकांचा धडाका लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील येणकी गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
"मी भाजपमध्ये जाणार आहे, म्हणून अफवाही पसरवल्या जात आहेत. काँग्रेसने जरी मला भाजपमध्ये जा म्हणून सांगितलं तरी मी जाणार नाही. कारण माझ्या रक्तात काँग्रेस आहे. भाजप हा फक्त अदानी आणि अंबानी या दोन लोकांचा वाली आहे. मात्र, काँग्रेसचे मायबाप हे लोक आहेत. इथे हुकूमशाही नसून लोकशाही आहे. मी आमदार, खासदार असेन माझ्या घरी पण इथे मी तुमची नोकर आहे. लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो, त्यामुळे चाबूक तुमच्या हातात आहे. मला सत्तेशी काही घेणं देणं नाही कारण ती मी लहानपणापासून बघितलेली आहे. मला टक्केवारी करायची नाही कारण मी ठेकेदार नाही. मी एक कार्यकर्ती आहे," असे प्रणिती म्हणाल्या.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.