Solapur, 18 May : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागांची निवडणूक जाहीर झाली असून त्यात सोलापूरचाही समावेश आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता महायुतीत सोलापूरची जागा भाजपकडे जाणार हे निश्चित आहे. भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, राजन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरीलही एक नाव चर्चेत आहे. मात्र, त्याचा निर्णय सर्वस्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे सोलापुरातून विधान परिषदेची लॉटरी कोणाला लागणार, याची प्रचंड उत्सुकता आहे.
मागील २०१६ ते २०२२ या कालावधीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापुरातून प्रतिनिधीत्व केले होते. म्हणजेच २०२२ पासून सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रलंबित होती. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, काही नगरपालिकांची मुदत संपूनही निवडणूक घेण्यात आली नव्हती. त्याला विविध कारणे आहेत. या सर्व संस्थांवर प्रशासक होता, त्यामुळे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक तब्बल चार वर्षे रखडली होती.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर आता भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे, त्यामुळे महायुतीत ही जागा भाजपकडे जाणार हे निश्चित आहे. भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, राजन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. तसेच बाहेरील जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचे नावही ऐनवेळी पुढे येऊ शकते, पण ते पालकमंत्री आणि स्थानिक भाजप नेत्यांवर अवलंबून आहे.
माजी आमदार पारिचारक यांनी पक्षासाठी दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत तर परिचारक यांनी माघार घ्यावी, यासाठी मनधरणी करायला थेट नागपूरहून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंढरपुरात आले होते. त्यावेळी बावनकुळेंनी परिचारक हे लवकरच विधीमंडळात दिसतील, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आणि विधानसभेतून निवडून द्यायच्या जागांमध्येही परिचारक यांचे नाव चर्चेत हेाते. मात्र, त्यांना संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे परिचारक यांचा दावा प्रबळ आहे.
राम सातपुतेही चर्चेत
संघटनेतून पुढे आलेले माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचेही नाव चर्चेत आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडींमध्ये सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांना जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण विभागाचे सभापती करण्यात आले आहे, त्यामुळे पत्नीनंतर पुन्हा पतीला म्हणजे राम सातपुते यांना संधी मिळते का, हे पाहावे लागेल.
झेडपीचे अध्यक्षपद राऊतांना आडवे येणार?
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे. त्यामुळे राऊत यांचाही दावा प्रबळ मानला जातो. पण राऊत यांचे समर्थक असलेले बार्शीचे दीपक वैद्य यांना झेडपीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. झेडपी अध्यक्षपद हे मोठे पद असून पुन्हा बार्शीत विधान परिषदेची उमेदवारी दिली जाते का हे पाहावे लागणार आहे.
अर्थपूर्ण ताकदीचीही परीक्षा
शशिकांत चव्हाण हे सोलापूरचे (पूर्व विभाग) जिल्हाध्यक्ष आहेत. ते संघटनेतून पुढे आलेले नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांनाही संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनाही आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार असलेल्या विधान परिषदेची निवडणूक वेगळ्या धाटणीवर जाते, त्यामुळे तेवढ्या तयारीची उमेदवार पक्षाला निवडावा लागतो. पालकमंत्री आणि संघटनेने मनावर घेतले तर चव्हाण यांना लॉटरी लागू शकते.
अनगरच्या पाटलांना संधी मिळणार?
भाजपकडून आणखी एक मोठं नाव चर्चेत आहे, ते म्हणजे माजी आमदार राजन पाटील. पाटील हे मुलासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मात्र, मुलाला मिळत नसल्यास ते स्वतः लढायला तयार असल्याची माहिती आहे. पाटील अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून ताकद दाखवून दिली आहे. पण त्यांचा भाजपमध्ये नुकताच प्रवेश झालेला आहे, त्यामुळे त्यांना एवढ्या तातडीने संधी मिळते का, हे पाहावे लागेल. भाजपची धक्कातंत्राची कार्यपद्धती पाहता ऐनवेळी निष्ठावंत म्हणून आर्श्चयकारक नाव पुढे येऊ शकते.
तो बडा नेता रिस्क घेणार?
मध्यंतरी माढा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचे एक नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आले होते. त्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना प्रश्नही विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी बाहेरचा आणि जिल्ह्यातील असा वाद निर्माण करण्याची गरज नाही. उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे तो बडा नेता परजिल्ह्यातून विधान परिषद निवडणूक लढण्याची रिस्क घेणार का, हाही प्रश्न आहे.
पालकमंत्र्यांचे आता मिशन माढा
पालकमंत्री जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले जबाबदारी दोन्ही लोकसभा सोडता बऱ्यापैकी फत्ते केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ही आमदारकी बहुधा माढा मतदारसंघात जाण्याची शक्यता आहे. मात्र, उमेदवारी कोणाला मिळणार, हे पालकमंत्री आणि भाजपश्रेष्ठींच्या हाती असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.