इस्लामपूर (जि. सांगली) : थोड्याच दिवसांत आपण उरूण-इस्लामपूर (Islampur) नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (NCP) उमेदवारी मागत असताना तुमच्या मनातील प्रभागाविषयी असणाऱ्या संकल्पना, प्रभागाचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार असले पाहिजे. उमेदवारी हवी असेल तर तुमच्या मनातील प्रभागाच्या संकल्पना मांडा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी इच्छुक उमेदवारांना पत्राद्वारे केले आहे. (Present the concept of ward in your mind : Jayant Patil's appeal to aspirants)
या पत्रात जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, लवकरच आपल्या शहरात नगरपरिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उमेदवारी मागणीचे अर्जही दिले. ‘सर्वप्रथम, आपण आपल्या पक्षाच्या विचारांची जपणूक करण्यासाठी निवडणूक लढायची तयारी दर्शवली आहे. यासाठी आपले धन्यवाद! उरूण-इस्लामपूरला आता विकासाची एक नवीन भरारी घ्यायची आहे आणि हाच आपला संकल्प असणार आहे.
‘आपला पक्ष हा पुरोगामी आणि सर्वसमावेशक विचारांचा आहे. उरूण-इस्लामपूर शहराच्या विकासात आपला दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे; म्हणून आम्ही आपल्याकडून, आपण ज्या प्रभागातून इच्छुक आहात, त्या प्रभागाचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ मागवू इच्छितो. आपण पक्षाच्या वतीने नगरसेवक म्हणून निवडून आलात, तर पुढील पाच वर्षांत आपल्या प्रभागात काय बदल आणणार आहात? कुठली नवीन विकास कामे हाती घेणार आहात? कुठल्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करणार आहात आणि लोककल्याणासाठी कुठली पावले उचलणार आहात, याची संक्षिप्त माहिती आम्हाला पाठवा. आपल्या प्रभागाबरोबरच शहराचा अधिक विकास घडविण्यासाठी आपली काय उद्दिष्टे आहेत, हेसुद्धा आम्हाला कळवा,’ असे आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना केले आहे.
वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न
आपण सर्व पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात, याचा मला गर्व आहे. कृपया आपले विचार मला कळवावेत, असेही पाटील म्हणाले. ही संकल्पना मांडत उरूण-इस्लामपूर नगरपरिषदेत पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.