Satara, 12 September : सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत बॅंक ताब्यात घेण्याची तयारी केलेली असताना सहकारात राजकीय जोडे बाजूला ठेऊन सर्वपक्षीय एकत्रित पॅनेल करण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यादृष्टीने ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काही विद्यमान ज्येष्ठ संचालकांची बॅंकेत महत्वपूर्ण बैठक झाली. येत्या दोन दिवसांत निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. यानिमित्ताने बॅंकेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, रामभाऊ लेंभे, सुनील खत्री, कांचन साळुंखे यांची आवर्जून उपस्थिती होती.
बॅंकेच्या बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत काही संचालकांची बॅंकेच्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये खलबते झाली. माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे बैठक संपताच निघून गेले. त्यानंतर खासदार नितीन पाटील, अनिल देसाई यांची रामराजेंसोबत तासभर बैठक झाली. यामध्ये येत्या दोन दिवसांत सर्वजण एकत्र बसून बॅंकेच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरविणार असल्याचे सांगण्यात आले.
भाजपच्या नेत्यांनी जिल्हा बॅंक ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, त्यामुळे भाजप स्वतंत्र पॅनेल करुन लढणार की सर्वसमावेशक पॅनेलसोबत राहणार याची उत्तरे आगामी आठवड्यात मिळणार आहेत. सध्यातरी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दुसरीकडे, बॅंकेचे विद्यमान संचालक शेखर गोरे यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यावेळीही ते असणार असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे कोण कोणाला ॲडजेस्ट करणार, याची उत्सुकता आहे.
बॅंकेच्या निवडणुकीबाबत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, बॅंकेच्या निवडणुकीबाबत येत्या दोन दिवसांत काही प्रमुख संचालकांची बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व काही ठरविले जाईल. फलटणमधून माझ्यासह बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांचेही ठराव आहेत. त्यामुळे आमच्यापैकी कोण दोघे बॅंकेत येणार हे लवकरच समजेल, असे त्यांनी सांगितले.
बॅंकेत महायुती म्हणून एकत्र लढणार का, या प्रश्नावर बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आम्ही जिल्हा बॅंकेत राजकारणाचे जोडे बाहेर ठेऊन कामकाज करतो. यावेळीही सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढली जाणार आहे, त्यामुळे कोणाचे स्वतंत्र पॅनेल हा विषय सध्यातरी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.