Pune News : रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तब्बल १५० नव्या रुग्णवाहिका पुण्यातील औंध येथे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात धूळ खात उभ्या आहेत. या रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणाची प्रतीक्षा असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा दावा फेटाळत संबंधित एजन्सीकडून वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट केले. येत्या १ डिसेंबर रोजी राज्यातील ३५० नव्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी '१०८' क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. अपघात, हृदयविकाराचा झटका, प्रसूतीसह अन्य आपत्कालीन परिस्थितीत ही सेवा रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. मात्र, राज्याच्या अनेक ग्रामीण भागांत पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तब्बल १५० नव्या रुग्णवाहिका वापराविना उभ्या असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ८१४ नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील '१०८' रुग्णवाहिका सेवेच्या व्यवस्थापनाशी संबंधित सुमित एसएसजी आणि बीव्हीजी महाराष्ट्र या संस्थांच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते. राज्यातील रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असले, तरी उपलब्ध झालेल्या नव्या रुग्णवाहिका प्रत्यक्षात सेवेत दाखल होण्यास विलंब होत असल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे.
या १५० रुग्णवाहिकांचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असून, त्यासाठी त्यांच्या तारखेची प्रतीक्षा असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीकडून वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. 'याबाबत आम्ही युद्धपातळीवर आढावा घेत आहोत. लवकरच या रुग्णवाहिका सेवेत दाखल होतील. राज्यात जवळपास १,७५० नवीन रुग्णवाहिका आणण्यात येत असून, त्यापैकी ३५० रुग्णवाहिकांचे १ डिसेंबर रोजी लोकार्पण करण्याचा मानस आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहनांची नोंदणी रखडली; जबाबदारी कुणाची?
आरोग्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया रखडल्याची बाब समोर आली आहे. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतरही त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्याप का पूर्ण झाली नाही? संबंधित एजन्सीकडून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी १ डिसेंबर रोजी ३५० रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचा मानस व्यक्त केला असला, तरी पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या १५० रुग्णवाहिकांचा त्यात समावेश असणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.