Pimpri Chinchwad Police Commissioner
Pimpri Chinchwad Police Commissioner sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'रावण गँग'च्या चौघांना कराडमध्ये सिनेस्टाईल पकडलं

सरकारनामा ब्युरो

सातारा : मोक्का कारवाईमध्ये पसार असणाऱ्या रावण गँग मधील चौघांसह आणखी एकास कराड (Karad) तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. कराड तालुक्यातील घारेवाडी येथे शुक्रवारी (ता.८) सायंकाळी कराड तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad police)मदतीने सिने स्टाइलने ही कारवाई केली. संशयितांना पुढील कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रावण गँग मधील सुरज चंद्रदत्त खपाले, ऋतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (दोघेही रा. रोकडे वस्ती, चिखली, पुणे) सचिन नितीन गायकवाड (रा. चिखली गावठाण, पुणे), अक्षय गोपीनाथ चव्हाण (रा. लक्ष्मी रोड चिखली, पुणे) यांच्यासह बाळा उर्फ विकी उर्फ अनिरुद्ध राजू जाधव (रा. जाधव वस्ती, रावेर, पुणे) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यांमध्ये सुरज खपाले, मुंग्या रोकडे, सचिन गायकवाड व अक्षय चव्हाण यांच्यावर संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर 'रावण गेम' मधील वरील संशयित पसार होते. त्यामुळे पोलिस त्यांचा शोध घेत होते. तर वाकड पोलिस ठाणे हद्दीत पिस्तूल तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये अनिरुद्ध जाधव पोलिसांना पाहिजे होता. त्याचाही पोलिस शोध घेत होते. वरील संशयित पाच जण कराड तालुक्यातील घारेवाडी येथे राहत असल्याची माहित पोलिसांना गोपनीय बातमी दाराकडून समजली.

कराड तालुका पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. पथक तयार करून गुरुवारी सायंकाळी संशयित राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकला. यावेळी संशयिताने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा तास पोलिस आणि संशयित यांच्यामध्ये झटापट सुरू होती. या झटापटीमध्ये काही संशयितांनी कंपाउंडवरून उडी मारून ओढ्याकडेने उसाच्या शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करून एकाला कंपाउंड वरतीच, दुसऱ्याला ओढ्याकाठाला तर आणखी एकाला उसाच्या शेतात असे पाचही संशयितांना पकडले.

पकडलेल्या पाच जणांपैकी चौघेजण रावण गँग मधील असून संशयितांवर चाकण, चिखली, देहूरोड, खेड, निगडी, लोणीकंद आधी पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत, पिस्तूल तस्करी अशा स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत. कराड तालुका पोलिसांनी पकडलेल्या संशयितांना पुढील कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishnaprakash), सातारचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सखाराम बिराजदार, पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर यांच्यासह कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस नाईक सज्जन जगताप, अमित पवार, कॉन्स्टेबल संग्राम फडतरे तसेच पिंपरी चिंचवडचे सहाय्यक फौजदार पठाण, पोलीस मेदगे, कॉन्स्टेबल मोहिते, कदम यांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT