Raju Shetti-Narendra Modi
Raju Shetti-Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

...मोदीसाहेब माझी विशेष काळजी घेत आहेत : राजू शेट्टींचे वक्तव्य!

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पीएम किसान योजनाच मुळात बोगस आहे. मी या योजनेसाठी अपात्र आहे; म्हणून १२ हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांकडे जमा केला. तरीही मला नियमितपणे पैसे येत आहेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सोलापुरात बोलताना सांगितले. तेवढ्यात एका पत्रकाराने ‘तुम्ही शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे...’ असा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रश्न मध्येच तोडत शेट्टी म्हणाले की, ‘हं... मोदीसाहेब (Narendra Modi), माझी विशेष काळजी घेत आहेत.’ त्यानंतर मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (Questions raised by Raju Shetty on PM Kisan Yojana)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘हुंकार बळीराजा’चा यात्रा सोमवारी (ता. १८ एप्रिल) सोलापुरात आली होती. संघटनेच्या बैठकीनंतर शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना वरील विधान केले. ते म्हणाले की, पीएम किसान योजनाच मुळात बोगस आहे. या योजनेसाठीचे पात्र-अपात्रतेचे काय निकष आहेत. पीएम किसान योजनेतून मला पैसे मिळावेत, यासाठी मी कधीही अर्ज केलला नाही. पण, या योजनेचे मला नियमितपणे दोन हजार रुपये येतात.

माझ्या नावाने नियमित जमा होणारे हे दोन हजार रुपये म्हणजे मला ट्रॅप वाटला; म्हणून मी १२ हजार रुपयांचा धनादेश एकदा तहसीलदारांना परत दिला. मी या योजनेसाठी अपात्र आहे; कारण मी माजी लोकप्रतिनिधी आहे. असं कोणी म्हणायला नको की, मी या योजनेचा गैरफायदा घेत आहे. त्यासाठी मी बारा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांकडे परत केला. तहसीलदारांनी तो जमा करूनही घेतला, तरीही मला नियमितपणे पैसे येत आहेत. मी केवायसीही दिलेले नाही. मागणाऱ्यांना मिळत नाहीत आणि अपात्र लोकांना पैसे मिळतात, असे सांगून राजू शेट्टी यांनी पीएम किसान योजनेवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

तेवढ्यात एका पत्रकाराने‘ तुम्ही शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे...’ असा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मध्येच तोडत राजू शेट्टी म्हणाले की, हं... मोदीसाहेब, माझी विशेष काळजी घेत आहेत.’ त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT