Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : मागील अडीच वर्षात राज्याचा विकास 25 वर्षांनी मागे गेला

विलास कुलकर्णी

Radhakrishna Vikhe Patil : राहुरी येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांचा आज (रविवारी) नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, चाचा तनपुरे, शिवाजी सोनवणे, उदयसिंह पाटील, शामराव निमसे, आसाराम ढूस, भैय्यासाहेब शेळके, तान्हाजी धसाळ, रवींद्र म्हसे उपस्थित होते.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "मागील अडीच वर्षात राज्याचा विकास 25 वर्षांनी मागे गेला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जनाधार नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. बिघाडी सरकारने सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता एवढेच काम केले. मागील सरकारमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार वसुली माफियागिरी झाली. लोकाभिमुख कामे ठप्प राहिली. कोरोनात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री घरी बसले. राज्य वार्‍यावर सोडले. केंद्र सरकारने कोरोनाची लस उपलब्ध करून दिली. 2024 साली राज्यात पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता येईल." असेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, "राज्यात पशुधनावरील लंम्पी आजार नियंत्रणात आणला आहे. त्यासाठी शासनातर्फे मोफत औषधे, लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याला मार्च 2023 पर्यंत पाणी देऊ. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना नगरचे जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत." असे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील म्हणाले, "नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान दिले जाईल. सुरत-हैद्राबाद महामार्गाच्या भूसंपादनाचा व कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावू. राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा शंभर खाटांचा सुसज्ज दवाखाना उभारला जाईल. भूमी अभिलेखचे काम गतिमान करून, शेतकऱ्यांचा अर्ज केल्यावर एक महिन्याच्या आंत जमीन मोजण्याची प्रक्रिया केली जाईल. राहुरीतील सरकारी जमिनी, ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार नाही. परंतु, वीज बिले भरली पाहिजेत."

खासदार डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले, "राहुरीच्या भुयारी गटाराचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढविल्या जातील. यापूर्वी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणुकीत विरोधकांशी केलेल्या आघाड्या यापुढे चालणार नाहीत. कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षावर व नेत्यांवर निष्ठा ठेवावी. राहुरीचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी जनतेची कामे करावीत. वाड्याची चाकरी करू नये. अन्यथा परिणाम भोगावे लागतील. अशा शब्दात खडेबोल सुनावले."

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आमदार तनपुरेंवर हल्लाबोल केला. राहुरी व ब्राह्मणी पाणी योजना श्रेयासाठी रखडवली. नागरदेवळेचा विकास 50 वर्षांनी मागे गेल्याची टीका करणारे नगरविकास राज्यमंत्री असतांना राहुरीच्या भुयारी गटाराचा, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडवता आला नाही," असा आरोपही त्यांनी केला.

ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील यांनी "सुरत-हैद्राबाद महामार्गाच्या भूसंपादन प्रश्नावर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. मुळा प्रवरा वीज संस्थेचे पुनरुज्जीवन करावे." अशी मागणी केली. माजी आमदार कदम यांनी देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी निधीची मागणी केली. रवींद्र म्हसे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT