Radhakrishna Vikhe Patil  Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देणाऱ्यांनीच त्यांना वाऱ्यावर सोडले...

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) हे पुणतांबा ग्रामपंचायतीने विकसित केलेल्‍या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी गेले होते.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - पुणतांबे ( जि. अहमदनगर ) येथील शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळावा व इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच काल ( शुक्रवारी ) भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) हे पुणतांबा ग्रामपंचायतीने विकसित केलेल्‍या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी गेले होते. या प्रसंगी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said, only those who promised help to the farmers let them go )

भास्‍करराव चव्‍हाण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमाला सरपंच डॉ.धनंजय धनवटे, जिल्‍हा परिषद सदस्‍य श्याम माळी, उपसरपंच महेश चव्‍हाण, पंचायत समिती सदस्‍या सुवर्णा तेलोरे, गणेश कारखान्‍याचे संचालक राजेंद्र थोरात, सुभाषराव कुलकर्णी, यशवंतराव चौधरी, शुक्‍लेश्‍वर वहाडणे, संगिता भोरकडे, अॅड. चांगदेव धनवटे यांच्‍यासह ग्रामस्‍थ उपस्थित होते. या कार्यक्रमात पुणतांबा येथील असंख्‍य तरुण कार्यकर्त्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, बांधावर जावून ज्‍यांनी शेतकऱ्यांना मदतीच्‍या मदतीची आश्‍वासनं दिले, त्‍यांनीच आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. सरकारचे धोरण फक्‍त बिल्‍डरधार्जीणे आहे. सरकार सत्‍तेतील आमदारांनाच निधी देत नाही तर शेतक-यांच्‍या योजनांना केव्‍हा देणार? असा प्रश्‍न उपस्थित करुन, लसीकरणाचा वाचलेला पैसा मदत म्‍हणून शेतकऱ्यांना द्या अशी मागणी राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्‍या कारभारावर टीका करताना ते म्हणाले की, संकटाच्‍या काळात जनतेच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याऐवजी सरकार दोन वर्षे घरात बसले. माझे कुटूंब माझी जबाबदारी म्‍हणणारे मंत्री स्‍वत:च्‍या कुटूंबाच्‍या कुटूंबाची काळजी घेत बसल्‍याने जनतेला सुध्‍दा माझा जीव माझी जबाबदारी असे म्‍हणण्‍याची वेळ आली असा टोला लगावून कोविड संकटात कर्तव्‍य बजावण्‍यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने जनतेच्‍या हिताचे निर्णय घेतल्‍यामुळे आत्‍मनिर्भरतेने देश पुन्‍हा उभारी घेवून वाटचाल करीत असल्‍याकडे लक्ष वेधून आमदार विखे पाटील यांनी सांगितले की, देशातील 180 कोटी लोकांचे लसीकरण मोफत पूर्ण करुन, विश्‍वविक्रम करतानाच 80 कोटी लोकांना मोफत धान्‍य देवून देशातील उपासमारी टाळली. 20 लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर करुन, समाजातील सर्वच घटकांना मदतीचा हात देण्‍याचे काम मोदींनी केल्‍यामुळेच ते आज विश्‍वनेता झाले असल्‍याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस आणि शिवसेनेने सर्व तत्‍व गुंडाळली

महाविकास आघाडी सरकार हे जनतेचा विश्‍वासघात करुन, सत्‍तेवर आले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने सर्व तत्‍व गुंडाळली आहेत. राष्‍ट्रवादीला कोणतेही तत्‍वच राहिलेले नाही. केवळ सत्‍तेसाठी एकत्र आलेल्‍या या तीनही पक्षांना जनतेचे कोणतेही देणे-घेणे राहिलेले नाही. अडीच वर्षांच्‍या कार्यकाळात हे सरकार राज्‍याच्‍या अथवा जनतेच्‍या हिताचा एकही निर्णय घेवू शकलेले नाही. सरकार फक्‍त बिल्‍डरांना मदत करते, विदेशी दारुवरील कर माफ करते मात्र अडचणीत सापडलेल्‍या शेतकऱ्यांना कोणतीही मदत करीत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील कृषी योजना ठप्प

आज राज्‍यात निधीअभावी कृषी योजना ठप्‍प झाल्‍या आहेत, कृषी विकासाचा कार्यक्रम पूर्णपणे थांबला आहे. नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून होत नाही. यापूर्वी बांधावर जावून मदतीच्‍या वल्‍गना करणारेच आता शेतकऱ्यांना कवडीचीही मदत करायला तयार नाहीत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्‍याच्‍या घोषणा आत्तापर्यंत तीन वेळा झाल्‍या मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु शकलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.

जनतेची मनविचलित करण्यासाठी...

जनतेचे लक्ष विचलित करण्‍यासाठीच वेगवेगळे मुद्दे महाविकास आघाडी सरकारकडून उपस्थित केले जात आहेत. सत्‍तेतील आमदारांमध्‍येच आता निधीवरुन वाद सुरू झाले आहेत. जिथे आमदारांनाच काही मिळेना तिथे शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्‍न उपस्थित करुन, या राज्‍यात हनुमान चालीसा म्‍णणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्‍हे दाखल होतात मात्र औरंगजेबाच्‍या कबरीवर जावून फुले वाहणाऱ्यांविरुध्‍द महाविकास आघाडी सरकार कोणतीही कारवाई करत नाही हे दुर्दैव असल्‍याचे मत आमदार विखे पाटील यांनी शेवटी व्‍यक्‍त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT