Samrat Mahadik and Rahul Mahadik
Samrat Mahadik and Rahul Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नाईकांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर आता महाडिक बंधू दाखवणार ताकद

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता भाजपमधील त्यांचे सहकारी असलेले राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक हे बंधू तालुक्यात ताकद दाखवून देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आगामी काळात शिराळ्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत शिराळ्यातून राष्ट्रवादीच्या (NCP) मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख हे दोघे एकत्रित आले होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक निवडून आले होते. त्यानंतर महाडिक बंधूंनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात हे तिन्ही गट एकत्र आले होते. आता शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे.

या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महाडिक बंधूंनी केली आहे. ते आपली ताकद दाखवून देण्याच्या तयारीत आहेत. पेठनाका येथे व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या आवारात दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्याचे अनावरण एप्रिलमध्ये होणार आहे. या वेळी भाजपमधील बड्या नेत्यांना निमंत्रित करुन भाजपची ताकद दाखवून दिली जाणार आहे. महाडिक बंधू या निमित्ताने शिराळ्यातील जनतेला नाईक यांनी भाजप सोडल्याने काहीही फरक पडत नसल्याचेही दाखवून देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाईक यांनी मागील आठवड्यात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांची भेट घेतली. वाढदिवसाचे औचित्य साधून झालेल्या भेटीत नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं.बुधवारी झालेल्या बैठकीला आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik), रणधीर नाईक, सत्यजित नाईक, अभिजित नाईक उपस्थित होते. नाईक हे मागील दोन वर्षांपासून भाजपवर नाराज आहेत. 2014 मध्येही त्यांना मंत्रिपद न दिल्यानं उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. नाईक हे 2 एप्रिलला राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करतील, असे समजते. यादिवशी शिराळ्यात शेतकरी मेळाव्ये आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत नाईक यांचा राष्ट्रवादीत अधिकृतपणे प्रवेश होईल.

शिवाजीराव नाईक यांचा राजकीय व जिल्हापरिषदेचा ११ वर्षाचा अनुभव पाहता ते राष्ट्रवादीत आले तर त्यांना वरिष्ठ पातळीवर चांगली संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानसिंगराव नाईक यांच्यासाठी हा मतदार संघ सुरक्षित राहील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, बाजार समिती व शिराळा नगरपंचायत या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील. रणधीर नाईक यांच्या राजकीय वाटचालीचा व शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचा मार्ग सुकर होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT