Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.

सरकारनामा ब्युरो

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी काल ( शनिवारी ) ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यासह महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुण्यात आले असता पत्रकारांनी यावर त्यांना प्रतिक्रिया विचारली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. ( Raj Thackeray changes color like a lizard - Ajit Pawar )

अजित पवार म्हणाले, त्या व्यक्तीला टीका व नकलांशिवाय दुसरे काही जमत नाही. त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावे की, एकेकाळी त्यांच्या पक्षाचे 14 आमदार निवडून आले होते. ते त्यांना सोडून का गेले. नुसती भाषणे करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. ते एवढी पलटी मारतात की मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी पूर्णपणे आताच्या केंद्रातील सरकार विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतरच्या काळात विधानसभेच्या वेळी त्यांनी काय केले हे आपण पाहिले. आणि कालच्या सभेत काय केलं हेही पाहिलं. राज ठाकरे यांचे सरड्या सारखं रंगबदलण्याचे काम सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवार पुढे म्हणाले की, त्यांची एकेकाळची विश्वासार्हता होती. त्यांना नाशिक व पुण्याने पाठिंबा दिला होता. त्यांच्या नावावर काही आमदार निवडून आले होते. मात्र त्यातील वांजळेंसारखे काही आमदार हयात नाहीत. मात्र जे हयात आहेत. त्यातील किती आमदार त्यांच्या जवळ आहेत. हे आपण पहावं.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेकाळी टीका केली. त्यानंतर त्यांची मुलाखत घेऊन त्यांचे कौतुक केले. असा काय चमत्कार घडला की त्यावेळी शरद पवार त्यांना मुलाखत घेताना जातीयवादी वाटले नाहीत आणि काही दिवसांतच एकदम जातीयवादी वाटायला लागले. शरद पवार यांना 1962 पासून युवक काँग्रेसचे काम करत राजकारण सुरू केले. त्यावेळी या लोकांचे जन्म देखील झाले नव्हते. त्यांनी शरद पवारांच्या बद्दल टीका टिपण्णी करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकल्या सारखे आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. आता त्यांच्याकडे एक नकलाकार म्हणून पाहिले जाते. नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का? सभेत हलकाफुलका एखादा विनोद करून श्रोत्यांना हसविण्याचा प्रयत्न काहीजण करतात. मात्र राज ठाकरे भाषणभर हसविण्याचे काम करतात. ते कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे हेच जातीयवादी

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या बाबत वक्तव्य केले होते. यावर अजित पवार यांनी सांगितले की, मशिदीवरील भोंग्यांबाबत न्यायालय सांगतील त्या प्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल. त्यांना आज हे मशिदीवरील भोंगे आठवले. मशिदीवर भोंगे अनेक वर्षांपासून आहेत. त्यांना ते आजच का दिसले. राज ठाकरे हे स्वतःच जातीयवादी आहेत. मात्र त्यांनी शरद पवारांबाबत काही वेगळे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता शरद पवारांनी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वांना बरोबर घेत पुढे गेले आहेत. आरोप करणाऱ्यांचा इतिहास तपासल्यावर दूध का दूध पाणी का पाणी होईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईवर राज ठाकरे यांनी वक्तव्य केले होते. यावर अजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांनाही ईडीने बोलावले होते. चौकशी यंत्रणा त्यांचे काम करत असतात. ज्या भारतीय नागरिकांना चौकशीसाठी बोलावले जाते त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. तो एक यंत्रणेचा भाग आहे. या गोष्टीकडे कोणी कसे पहावे हा ज्याचा त्याचा भाग आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पासून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार स्थापन होताच विरोधक म्हणाले होते की हे सरकार दोन दिवसांत पडेल. नंतर म्हणाले सहा महिन्यांत पडेल. एक, दीड, दोन, अडीच वर्षांत पडेल असे सांगत राहिले. त्यांच्यातील एका नेत्याने यंदाच्या विधानसभा अधिवेशन काळात पाच का सहा तारीख जाहीर केली होती. नंतर 11 तारीख सांगितली. कुणाला काय बोलायचे हा त्यांचा अधिकार आहे. मला आरोप-प्रत्यारोपात रस नाही. जनतेच्या विकासात रस आहे. जनता जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तो पर्यंत आम्ही महाराष्ट्राचा विकास करत राहणार, असेही अजित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT