Raj Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raj Thackeray On Reservation : आरक्षणाबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान; ‘महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही’

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 August : महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही, असे मोठे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले आहे. त्यावर काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसीमधील समावेशाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे हे विधान धाडसाचे आणि महत्वपूर्ण ठरत आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज (ता. 05 ऑगस्ट) सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. ते आज दिवसभर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबतचे (Reservation) विधान केले आहे.

ते म्हणाले, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या भागात उड्डाणपुले व इतर गोष्टी होत आहेत. त्या महाराष्ट्रातील मूळच्या लोकसंख्येसाठी होत नाहीत. बाहेरून आलेल्या लोकसंख्येसाठी या सोयी सुविधा होत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांसाठी राज्याचा सर्वाधिक पैसा खर्च होत आहे.

ठाणे हा देशातील हा एकमेव जिल्हा जिथे 7-8 महापालिका आहेत. एकाच जिल्ह्यात सात ते आठ महापालिका असतील तर मग इथली लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली आहे का? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा एवढा मोठा आहे की, त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, आपल्याकडे नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. पण आपल्याकडच्या तरुणांना माहितीच नसतं की नोकऱ्या कुठे निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या यूपी आणि बिहारमधील वर्तमानपत्रात जाहिराती येतात आणि महाराष्ट्रात येत नाहीत. राज्यातील उद्योगधंद्यात नोकऱ्या आहेत, हे बाहेरच्या लोकांना कळतं आणि आपल्या पोरांना कळत नाही. त्यांनाही नोकरी करायची असते, त्यांचं आयुष्य उभं करायचं असतं.

अशा परिस्थितीत आपल्य राज्य चालवंल जातंय. गेली अनेक वर्षे असंच चालवलं जातंय. मी त्यावर गेली काही वर्षे सातत्याने बोलत आहे. बेरोजगारांची यादी यायची, तीही आता बंद झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना आपल्याला आरक्षणाची गरजच नाही. पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातील लोकांना संधी द्या. त्यातूनही उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार करत नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT