Rajan Patil
Rajan Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधी...’ या वादग्रस्त विधानावर राजन पाटलांची अखेर दिलगिरी

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sugar Factory) निवडणुकीत (Election) विरोधकांनी आम्हाला टीकेचे लक्ष्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलांना ‘बाळ... बाळ’ या नावाने बोलून सभेतून तोंडसुख घेण्याची पातळी ओलांडली. ते सहन न झाल्यामुळेच केवळ त्यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठीच मी बोललो. मात्र, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. तरीही, माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून आमच्या चारित्र्याविषयी कोणीही बोलून राजकीय भांडवल करू नये, असे आवाहन माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी विरोधकांना केले. (Rajan Patil apologized for that controversial statement)

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांनी ‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात,’ असं वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ उठला होता. माजी आमदार पाटील यांनी त्यावर दिलगिरी व्यक्त करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

माजी आमदार पाटील म्हणाले, भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोधक व्हावी, यासाठी आमच्याकडे लोक आले होते. पण, एखादी जागा घ्या, असे सांगून आमचा अपमानच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आमच्या कार्यकर्त्यांसाठी भीमा कारखान्याची निवडणूक लढणे गरजेचेच होते आणि आम्ही ती लढलो. सभासदांनी निवडणूकीत दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने मान्य केला. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार मतदार बोगस पद्धतीले वाढविले. ती न्यायप्रविष्ठ बाब आहे, त्याबाबतचा निकाल निवडणुकीपूर्वी झाला असता तर आमची मते वाढली असती. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही.

निवडणूक प्रचारात माझ्या मुलांना विरोधकांनी सातत्याने ‘बाळं... बाळं...’ असे बोलून आमच्यावर तोंडसुख घेतले. केवळ त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी मी बोलून गेलो. त्यानंतर मात्र, आमच्या विरोधकांकडून आमच्या चारित्र्याविषयीची अफवा पसरविली जात आहे.आम्ही काय आहोत? आणि आमचे चारित्र्य कसे आहे? हे संपूर्ण मोहोळ तालुक्याला माहीत आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

राजन पाटील म्हणाले की, यापूर्वी माझा मोठा मुलगा विक्रांत (बाळराजे पाटील) यांना विरोधकांनी खुनाच्या गुन्ह्यात गोवले होते. पण, न्यायदेवतेने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आमच्या परिवाराला त्या प्रकरणात नाहक त्रास सहन करावा लागला. आमची राज्यभरात मानहानी झाली. विरोधकांकडून सातत्याने आम्हाला बदनाम करण्याचे कटकारस्थान सुरु असते. पण, तालुक्यातील जनतेने अशा प्रवृत्तींना कधीही थारा दिला नाही. आमच्या कुटुंबावर सातत्याने विश्वास दाखविला आहे. आम्हीही जनतेच्या विश्वासाला प्रामाणिकपणे पात्र राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. आमदार म्हणून काम करताना संपूर्ण तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले. बाळराजे आणि अजिंक्यराणा ही माझी दोन्ही मुले सुसंस्कृत आहेत. ते विविध पदांवर काम करतात. राजकारणापेक्षा समाजकारणाला ते नेहमीच प्राधान्य देतात. दिवसभर माझे आणि माझ्या मुलांकडून समाजकारणाचे काम होते. हे संबंध मोहोळ तालुक्याला माहित आहे.

‘मोहोळच्या जनतेचा आमच्यावर गाढा विश्वास’

(स्व.) बाबूरावअण्णा पाटील यांचे आदर्श विचार घेऊनच आम्ही सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांप्रती प्रेमाची भावना ठेवून काम करीत आहोत. आम्हाला मोहोळ तालुक्यातील जनतेने नेहमी स्वतःच्या कुटुंबातील सदस्य मानले आहे. आम्हीही प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होतो. आम्ही जनतेसोबत प्रामाणिपणे, विश्वासाने आणि सुसंस्कृतपणे आदराने वागतो, त्यामुळे तालुक्यातील जनता आमच्यावर निखळ प्रेम करते. मागील दोन विधानसभा निवडणुकीत जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून नवख्या उमेदवारांना निवडून दिले. यातूनच मोहोळ तालुक्यातील जनतेचा आमच्यावर किती गाढ विश्वास आहे, हे स्पष्ट होते, असेही राजन पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT